गेल्या सहा महिन्यांपासून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आजारी होते. तब्येतीच्या असंख्य तक्रारींमुळे त्यांच्या डॉक्टर मुलांनी घरातच त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग उभारला होता. अखेर बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पाडगावकरांची प्राणज्योत मालवली. दत्त निवासातल्या घरी त्यांची लिखाणाची एक स्वतंत्र खोली होती. या खोलीतच आपल्याला मरण यावे अशी त्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. बाबांनी लिखाणाच्या खोलीतच अखेरचा श्वास घेतला, असे सांगताना त्यांचा धाकटा मुलागा डॉ. अजित पाडगावकर यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
बुधवारी दुपारी पाडगावकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या कवितेतून जगण्यावर आणि जन्मावर शतदा प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या पाडगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक कवी, साहित्यिक, कलाकार, प्रकाशक, राजकारणी आदींनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि जीवनयात्री कवीचे अखेरचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडगावकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली व कुटुंबियांचे सांत्वन केले. स्वातंत्र्यानंतर मराठीत उदयाला आलेल्या नवकवींच्या मांदियाळीत मंगेश पाडगावकर हे एक अग्रेसर नाव. कोवळ्या वयातल्या त्यांच्या कवितांवर कविवर्य बा. भ. बोरकर यांचा स्पष्ट प्रभाव दिसतो, असं जाणकारांचे म्हणणे आहे.
साठ-सत्तरच्या दशकांत पाडगावकरांची भावगीते आणि यशवंत देव-श्रीनिवास खळे यांचे संगीत हे समीकरण अतिशय लोकप्रिय झाले. टेलिव्हिजनची झगमग सुरू होण्यापूर्वी आकाशवाणी हे मध्यमवर्गीय मराठी माणसाचे आनंदनिधान होते.
आकाशवाणीमुळे पाडगावकरांची दर्दमधुर, सौम्य सुरावटीची गाणी घरोघरी पोहोचली आणि मराठी भावजीवनाचा भाग झाली. प्रेमाचे निरनिराळे विभ्रम आपल्या गर्भश्रीमंती शैलीत शब्दबद्ध करणारे, प्रेमळ भाववृत्तीचे पाडगावकर अखेरच्या काळात मात्र कबीर, मीरा आणि बायबलकडे वळले तेव्हा आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांकडे बोलून दाखवली होती.
‘जिप्सी’नंतर पाडगावकरांची कविता कुसुमाग्रज-बोरकरांचे संस्कार पचवून स्वत:ची वेगळी वाट चोखाळते. लोभस प्रतिमासृष्टी, मोहक शब्दकळा, प्रेमाची तरल, भावार्त अनुभूती आणि गेयता या गुणांमुळे पाडगावकरांची कविता वाचकांच्या मनाला भुरळ घालत आली आहे. ‘एकीकडे अवीट गोडीची भावगीते लिहिणारे पाडगावकर ‘सांग सांग भोलानाथ’ असे मिठ्ठास बालगीतसुद्धा लिहून जात, याचे कौतुक करावे तितके थोडे.
– डॉ. मीना वैशंपायन, ज्येष्ठ अभ्यासक
शब्दांसोबतच जगाचा निरोप
गेल्या सहा महिन्यांपासून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आजारी होते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-12-2015 at 04:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poet mangesh padgaonkar passed away