अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रसारण करण्यासाठी जर शुल्क आकारले जाण्याची प्रथा असेल तर ती चालू ठेवावी, असे मत काही साहित्यिकांनी व्यक्त केले तर काही साहित्यिकांनी सावध पवित्रा घेत आम्हाला या वादात ओढू नका, अशी भूमिका घेतली.
साहित्य संमेलनाच्या दूरदर्शनवरील मोफत प्रसारणाची मागणी करणाऱ्यांना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोदी तावडे यांनी ‘फुकटेगिरी बंद करा’, असा सल्ला दिला होता. त्याबाबत ‘लोकसत्ता’ने काही साहित्यिकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
ज्येष्ठ कथाकार व समीक्षिका प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष म्हणाल्या, संमेलनाचे उद्घाटन व समारोप यांचे प्रक्षेपण दाखविण्यासाठी शुल्क आकारण्याची जर प्रथा असेल तर ती यापुढेही तशीच चालू ठेवावी. ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनीही शुल्क आकारूनच संमेलन सोहळ्याचे प्रसारण केले जात असेल तर या वेळीही अशी सवलत मागू नये. ते योग्य वाटत नाही, अशी भूमिका मांडली.
ज्येष्ठ साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी ‘मी सुखात आहे, या वादात मला ओढू नका’ अशी, तर घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ . सदानंद मोरे यांनीही ‘मी याविषयी आता काहीही भाष्य करणार नाही. मी सध्या तरी या वादात पडू इच्छित नाही’, अशी सावध भूमिका घेतली.
‘समाजाचा पुढाकार हवा’
माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, प्रत्येक गोष्ट शासनाने करावी, असे आपण गृहीत धरू लागलो आहोत. हे केवळ साहित्य संमेलनाबाबत नाही तर एकूणच जीवन व्यवहाराबद्दल झाले आहे. समाजानेही काही बाबतीत स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. शासनाने मदत करणे अपेक्षित आहे, तशी मदत शासन करतेही. पण ते पुरेसे नाही. मराठी भाषा, साहित्य संमेलन यासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा. राज्यातील दहा ते बारा कोटी लोकांपैकी किमान दोन कोटी लोकांनी प्रत्येकी एक रुपया जरी दिला तरी त्यातून साहित्य संमेलन व अन्य खर्च भागू शकतो. दूरदर्शन व आकाशवाणी हे आता स्वायत्त झाले असून त्यांना कुठूनही पैसे मिळणे आवश्यक आहे आणि ते देणे फार काही अवघड नाही.
‘ही प्रबोधनाची माध्यमे’
ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी सांगितले, आकाशवाणी व रूपवाणी (दूरदर्शन) ही व्यावसायिक माध्यमे नाहीत, तर ती प्रबोधनाची आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी भाषा व साहित्याचा सांस्कृतिक सोहळा आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वेच्छेने याचे प्रसारण करावे आणि समाजापर्यंत पोहोचवावे.
घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्याकडे विचारणा केली असता, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे असे का बोलले याबाबत मी त्यांच्याशी बोलेन. त्यामुळे आता मला याविषयी काहीही मत व्यक्त करायचे नाही, असे सांगितले.  
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा