अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीऐवजी ‘नियुक्ती’ पद्धत सुरू करण्याच्या प्रस्तावाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातूनच अनेकांचा विरोध असल्याचे समोर येत आहे. सध्याची निवडणूक पद्धतच योग्य असल्याचे मत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत ही भूमिका मांडली जाणार असल्याने अंतर्गत विरोधामुळे ‘नियुक्ती’चा विषय बारगळण्याची चिन्हे आहेत.
महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, निवडणुकीऐवजी ‘नियुक्ती’ हे आम्हाला मान्य नाही. निवडणूक पद्धतीत काही दोष असले तरीही हीच पद्धत योग्य आहे. संमेलनाध्यक्षाची नियुक्ती केली गेली तर ही निवड फक्त मूठभर लोकांच्या हातात जाईल आणि मतदारांचा तो अपमान ठरेल. महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत आमची ही भूमिका आम्ही आग्रहाने मांडणार आहोत. तर मुंबई मराठी साहित्य संघ या घटक संस्थेच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे यांनीही नियुक्तीपेक्षा निवडणूक घेण्याची पद्धतच अधिक योग्य असल्याचे मत मांडले. महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे असताना आम्ही या विषयावर सुमारे ४०० साहित्यिकांना पत्र पाठवून त्यांचे मत काय, हे जाणून घेतले होते. आम्हाला प्राप्त झालेल्या पत्रांमध्ये बहुतांश मंडळींचे मत निवडणूक पद्धतीच्याच बाजूचे होते, असे मेहेंदळे यांनी नमूद केले.
महामंडळाची आणखी एक घटक संस्था असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही लोकशाहीचा आदर केला पाहिजे असे सांगत नियुक्ती पद्धतीला विरोध दर्शवला. तर महामंडळाची समाविष्ट संस्था असलेल्या गोमंतक मराठी साहित्य संस्थेचे सुरेश नाईक यांनीही नियुक्तीपेक्षा निवडणूक पद्धतच योग्य असल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader