आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर पंजाबमधून संत नामदेव गुरुद्वारा आणि अन्य आठ ठिकाणांहून संमेलनासाठी आमंत्रणे आली आहेत. मात्र येत्या ३१ मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळनिवड समितीची स्थापना होणार असून त्यानंतरच संमेलन कुठे घ्यायचे याचा निर्णय होणार आहे.
८७ वे साहित्य संमेलन सासवड येथे झाले होते. पुढील साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी दहा ठिकाणांहून आमंत्रणे आली आहेत. त्यापैकी एक आमंत्रण बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेचे आहे. अन्य ठिकाणांमध्ये सातारा, कल्याण, कळवा, कणकवली, जालना, उस्मानाबाद, तळोडी-चंद्रपूर, डोंबिवली आणि संत नामदेव गुरुद्वारा सभा- गुमान, पंजाब यांचा समावेश आहे.
संमेलनस्थान ठरवण्यासाठी सर्वप्रथम स्थळनिवड समितीची स्थापना होते. ही समिती आमंत्रण आलेल्या प्रत्येक ठिकाणी भेट देऊन पाहणी करते. तसेच आयोजक संस्था संमेलन भरविण्यासाठी किती सक्षम आहे, याबाबतही संबंधितांशी चर्चा करते. या समितीच्या अहवालानंतरच संमेलन स्थळ निश्चित केले जाते, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. साहित्य महामंडळाची बैठक ३१ मे रोजी पुण्यात होत आहे. त्या बैठकीत स्थळनिवड समितीची स्थापना केली जाईल, असेही डॉ. वैद्य म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा