मुख्य प्रवाहातील प्रमाण मराठीला पूरक ठरणाऱ्या राज्यातील काही बोलींचा/बोली भाषांचा भाषा विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साहित्य संस्कृती मंडळाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत बोलीभाषा कोश लवकरच प्रकाशित होणार आहे. बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी या कोशाचा उपयोग होणार आहे.
राज्यात मराठी भाषेशी साधर्म्य असणाऱ्या अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. प्रमाण भाषेची समृद्धता वाढविण्यासाठीही बोलीभाषा उपयुक्त ठरते. मराठीच्या ज्या काही बोली आहेत त्यातील काही शब्दांचा प्रमाण मराठी भाषेतही वापर केला जातो. राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने साहित्य व संस्कृती मंडळातर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून यात मालवणी, आगरी, अहिराणी, वऱ्हाडी, मराठवाडी आदी बोलीभाषांचा समावेश असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
राज्यातील विविध विद्यापीठांच्या मराठी भाषा विभागांकडे या प्रकल्पाचे काम सोपविण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाकडे मालवणी आणि आगरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे मराठवाडी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे अहिराणी आणि संत गाडगेबाबा विद्यापीठाकडे वऱ्हाडी भाषेच्या अभ्यासाचे काम आहे. सर्व विद्यापीठांकडून या प्रकल्पावर काम सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने २५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले असल्याचेही कर्णिक यांनी सांगितले.
राज्य शासनातर्फे ‘बोली भाषा अकादमी’ प्रस्तावित असून मंडळाच्या बोलीभाषा प्रकल्पाचा चांगला उपयोग या अकादमीसाठी होणार आहे. बोलीभाषा अकादमीसाठी राज्य शासनाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या भाषा तज्ज्ञांच्या समितीपुढे हे संशोधन ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बोलीभाषा अकादमीच्या स्थापनेत आणि अकादमीच्या पुढील कामसाठी मंडळाच्या बोलीभाषा कोशाचे तसेच अभ्यासाचे महत्त्वपूर्ण योगदान असेल, असा दावाही कर्णिक यांनी केला.   

Story img Loader