राज्यातील विद्यापीठे आणि अन्य संस्था- संघटनांकडून अन्य भाषकांना मराठी शिकविण्याच्या प्रक्रियेचे दस्तावेजीकरण केले जावे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता वर्गाचे माजी प्रपाठक आणि मराठीचे अभ्यासक प्र. ना. परांजपे यांनी गुरुवारी येथे केले.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी आणि जर्मन भाषा विभागातर्फे कालिना, विद्यानगरीत आयोजित करण्यात आलेल्या ‘अन्य भाषकांसाठी मराठीचे अध्यापन-वर्तमान स्वरूप आणि भवितव्य’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ‘अन्य भाषकांसाठी मराठीचे अध्यापन-अनुभवकथन’ या विषयावरील परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात वझे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रकाश परब आणि परदेशी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकविणाऱ्या डॉ. विजया देव हे वक्ते सहभागी झाले होते. ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे या कार्यशाळेत बीजभाषण झाले.
जे अन्य भाषक मराठी विषय/ भाषा शिकतात ते प्रामख्याने प्रौढ वयोगटातील असतात. तसेच या प्रत्येकाचा मराठी शिकण्याचा उद्देशही वेगवेगळा असतो. या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, अशी पुस्तके मोठय़ा प्रमाणात तयार व्हावीत, असे सांगून परांजपे म्हणाले की, विद्यापीठातील विविध भाषा विभागांनी भाषांतर विभाग सुरू करावा आणि मराठीतील निवडक साहित्य अन्य प्रादेशिक भाषेत तसेच अन्य भाषेतील साहित्य मराठी भाषेत अनुवादित व्हावे. मराठी भाषेत जे शब्द जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जातात, त्याचा कोश तयार केला जावा. अन्य भाषकांना मराठी शिकविण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल.
परदेशी विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आपले अनुभव मांडताना डॉ. विजया देव म्हणाल्या की, अन्य भाषकांना शिकविण्यासाठी साधनसामग्री उपलब्ध असली तरी ती पुरेशी नाही. माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. यात मराठीतील गोष्टींची पुस्तके त्यांच्याकडून वाचून घेणे, तो समाजात वावरताना त्याला बोलताना काही समस्या येऊ नयेत म्हणून कल्हईवाला, पोष्टमन, फुलवाला, रिक्षाचालक, डॉक्टर यांना घरी बोलावून त्यांचा संवाद या विद्यार्थ्यांशी घडवून आणला. प्रकाश परब यांनी सांगितले की, नवीन पिढीला मराठी भाषेत अध्ययन करावे, असे वाटत नाही. आपल्याविद्यापीठांनीही उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून प्रादेशिक भाषा सशक्त केल्या नाहीत तर इंग्रजीचेच सबलीकरण केले. मराठी भाषा टिकविणे, वाढविणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, असे आपण म्हणतो, तेव्हा ते उत्तरदायीत्व आपण प्रत्येकजण स्वीकारतो का, असा सवालही परब यांनी केला. या सत्राचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सुहासिनी किर्तीकर यांनी केले.
संसाधने पुरविली तर मराठीचे पुनरुत्थान अधिक वेगाने
– गिरीश कुबेर
माहिती-तंत्रज्ञान, औद्योगिक आणि वित्त विश्व, व्यापार आदी क्षेत्रात अनेक मराठी मंडळी उच्च पदांवर काम करत आहेत. अर्थक्षेत्रात मराठी माणसे कमी आहेत, हा तर मोठा गैरसमज आहे. उच्च श्रेणीत असलेले दहा मोठे म्युच्युअल फंड मराठी माणसेच चालवत आहेत. परदेशी वृत्तसंस्थांकडूनही मुंबई व महाराष्ट्रात चार ते पाच प्रतिनिधी नेमले गेले आहेत. एकूण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सध्या अनुकूल असे वातावरण असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि संसाधने पुरविली तर मराठीचे पुनरुथ्थान अधिक वेगाने होईल, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या बीजभाषणात केले.
मराठी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस यांनी प्रास्ताविक केले. जर्मन भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराणा यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. अन्य भाषकांना मराठी भाषा शिकविण्याचे काम गेली अनेक वर्षे करणारे सुहास लिमये व जयवंत चुनेकर यांनीही आपले अनुभव या वेळी मांडले. प्रा. आशा मटकर यांनी सूत्रसंचालन केले.