मुंबई : मराठी रंगभूमी गाजवणारे, आबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेले नाटक म्हणून देवेंद्र पेम लिखित – दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ नाटक ओळखले जाते. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. आता नव्या कलाकारांच्या संचात हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले असून त्याचा ५० वा प्रयोग रविवारी, ५ मे रोजी शिवाजी मंदिर येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९० च्या दशकाच्या सुरुवातीला रंगभूमीवर आलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकात अंकुश चौधरी, भरत जाधव आणि संजय नार्वेकर या तिघांच्या मुख्य भूमिका होत्या. या नाटकाने तिन्ही कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली. अत्यंत कमी कालावधीत ४५०० प्रयोगांचा विक्रमी टप्पा या नाटकाने गाठला होता. आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या नाटकाचे १० हजार प्रयोग झाले आहेत. तीस वर्षांनंतर नवीन कलाकारांना घेऊन पुन्हा रंगभूमीवर आलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळेल का ? या प्रश्नाला ५० व्या प्रयोगाचा टप्पा गाठत खणखणीत उत्तर दिले आहे. नव्याने आलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकात मयुरेश पेम, मनमीत पेम, रिचा, विकास पाटील या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा…मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक

तीस वर्षांपूर्वी ज्या प्रेक्षकांनी हे नाटक पाहिले ते आज त्यांच्या मुलांना घेऊन नाटक पाहायला येत आहेत. तरुण पिढीसुद्धा हे नाटक पाहायला गर्दी करत असल्याने केवळ तीन महिन्यात ५० प्रयोगांचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे, अशी भावना नाटकाच्या चमुकडून व्यक्त होते आहे. येत्या ५ मे रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे दुपारी ३.३० वाजता ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा ५० वा प्रयोग रंगणार आहे. “आजवर या नाटकाला नाट्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला, अपार प्रेम केले. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. आता नव्या संचात हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. हे नाटक लवकरच विश्वविक्रमी टप्पा गाठेल याची खात्री आहे”, असा विश्वास नाटकाचे लेखक – दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi theatre classic all the best marks 50th show within three months return with new actors mumbai print news psg
Show comments