सर्पविश्वाची इत्थंभूत माहिती मराठीत उपलब्ध
मुंबई : मानवी वस्तीत साप शिरल्यानंतर काय करावे याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ असतात. अनेकदा नागरिक सापांची शिकार करतात. हे प्रकार टाळण्यासाठी ‘स्नेकहबउपयोजना’च्या (अॅप) माध्यमातून जनजागृतीपर माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. गुरुवारी हे उपयोजन मराठीतही उपलब्ध झाले.
‘इंद्रियम् बायोलॉजिक्स’ या कंपनीने ‘कं पनी सामाजिक जबाबदारी’ (सीएसआर) निधीतून गतवर्षी स्नेकहब उपयोजनाची निर्मिती के ली. यात भारतातील १८३ सर्प प्रजातींची माहिती उपलब्ध आहे. यात महाराष्ट्रातील सर्व ७२ प्रजातींचा समावेश आहे. त्याचबरोबर सर्पदंश कसे टाळावेत, अडचणीतील सापांची व मानवांची सुटका कशी करावी आणि सर्पदंश झाल्यास काय करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. सापांचे शरीरशास्त्र समजावतानाच सापांविषयीचे समज-गैरसमज, सर्पदंश व उपचार यांची माहिती या उपयोजनाच्या माध्यमातून प्राणिप्रेमी आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उपयोजनाच्या इंग्रजी आवृत्तीत सापांची सर्वसाधारण माहिती असली तरी प्रादेशिक आवृत्तीत राज्यानुसार आढळणारी सापांची शरीरवैशिष्ट्ये व श्रद्धा-अंधश्रद्धा याबाबत जनजागृतीपर मजकू र देण्यात आला आहे. सापांचा नैसर्गिक इतिहास, शरीररचना, विस्तार, रंजक माहिती अशी विविध सदरे स्नेकहबमध्ये उपलब्ध असून शास्त्रीय संशोधने, पुस्तके, लिखाणातून, नोंदींतून शास्त्रीय आधारावर माहिती निवडण्यात आली आहे. सर्पप्रजाती शरीरवैशिष्ट्यांपासून खवल्यांच्या रचनेवरून, भौगोलिक विस्तारावरून कशा ओळखाव्यात याची सामान्य व शास्त्रीय माहिती मिळाल्यास सापांतील विषारी-बिनविषारी प्रजाती सामान्य माणसाला ओळखता येतील. परिणामी, सापांबद्दलची भीती कमी होऊन त्यांना जीवदान दिले जाईल. माहितीसोबत रेखांकने व छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत. प्रसिद्धी आणि वैद्यकीयदृष्ट्या महत्त्व यानुसार सापांची क्रमवारी लावण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सर्पमित्रांचे व सर्पदंशावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.