मुंबईत येत्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेची सध्या जय्यत तयारी सुरू असून यात तरुणांबरोबरच अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहायला मिळणार आहे. याशिवाय असाध्य आजारावर मात करून मुंबईकरांना जिद्दीचा संदेश देणारेही यात सहभागी होत आहेत.

मेघालयातील ७१ वर्षीय कमोइन शिलाँगमध्ये आजवर झालेल्या अनेक शर्यतींसह स्वर मॅरेथॉन, गुवाहाटी पिंकथॉन आणि एसबीआय ग्रीन मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या आहेत. मुंबई मॅरेथॉन ही कमोइन यांची शिलाँगबाहेरील पहिलीच शर्यत आहे. त्या ४२ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. सायकलपटू, गिर्यारोहक आणि धावपटू असणारे ८६ वर्षीय बिहाहळ्ळी जनार्दन हे मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणारे पुरुष गटातील वयाने सर्वात वयोवृद्ध धावपटू आहेत. जनार्दन यांनी वयाच्या ६४व्या वर्षी एक खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू केली होती. ५४ अर्ध मॅरेथॉन, ९ मॅरेथॉन आणि १२ अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ते धावले होते.

ज्येष्ठ नागरिक असलेले अमरजीत अंध आहेत. एका विमा कंपनीचे प्रतिनिधी असणारे अमरजित लॉटरीचे दुकान चालवून उदरनिर्वाह चालवतात.  अमरजित सिंग यांनी ९९ वेळा भारतात निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या अर्ध मॅरेथॉन आणि इतर स्पर्धामध्ये भाग घेतला होता. रुपयन रॉय यांच्यावर २०१६ मध्ये हृदयप्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेला एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी होण्यास सुरुवात केली. मॅरेथॉन शर्यतीतील प्रवास २०१७ पासून सुरू केला. मुंबई मॅरेथॉनद्वारे विविध सामाजिक संस्था आणि उपक्रमाला आर्थिक मदत करण्यात येते. आजवर ३२ कोटी रुपये जमा झालेले आहेत. हा निधी २७० सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहे

४६ हजार धावपटू

यंदाच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत ४६ हजार ५०० धावपट्टू धावणार आहेत.  ‘मुमकिन है’ आणि ‘बी बेटर’ असे उपक्रम असतील. धावपटूंना त्यांच्या क्षमतांना आव्हान देऊन त्यांच्या कक्षा रुंदावण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजकांतर्फे ‘टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिस’चे उपाध्यक्ष उज्वल माथूर यांनी सांगितले. यंदा पूर्ण मॅरेथॉन धावणाऱ्यांची संख्या २२ टक्क्यांनी वाढल्याची माहितीही त्यांनी दिली.