मराठवाडय़ात यंदाही कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडा-उत्तर महाराष्ट्र पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पाणी प्रश्नावरून आपल्यावर अन्याय होत आहे अशी दोन्ही विभागांची भावना होत असून त्याचे राजकीय भांडवल करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष होण्यापूर्वीच यावर शाश्वत मार्ग काढण्याची मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
गेल्या वर्षी कमी पावसामुळे एप्रिल-मे दरम्यान मराठवाडय़ात दुष्काळ आणि अभूतपूर्व पाणी टंचाई झाली होती. नाशिक-नगर जिल्ह्यांतील धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडावे या मागणीवरून मराठवाडा-आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यात संघर्ष उभा राहिला होता. पाण्याचा हा वाद उच्च न्यायालयात पोचल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने नगरमधील काही धरणांतून मराठवाडय़ासाठी पाणी सोडण्यात आले. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी मराठवाडय़ातील धरणे मात्र निम्यापर्यंतच भरली आहेत. या पाश्र्वभूमीवर या दोन भागातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून हा संभाव्य पाणीवाद टाळण्यासाठी आताच उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मराठवाडय़ात यंदाही कमी पाणी साठा असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पाण्यासाठी आग्रह धरला जाऊ शकतो. मात्र गेल्या वेळी अशा प्रकारे जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आले तेव्हा मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. यावेळीही या प्रश्नाचे राजकीय भांडवल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही विभागातील नेत्यांची एक बैठक घेऊन मार्ग काढावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. तसेच मुंबईच्या पाण्यासाठी वेगळी सोय करून उध्र्व वैतरणा धरणाचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून सोडावे. त्याचप्रमाणे कोकणात वाहून जाणारे पाणी अडवून ते उपसा सिंचनाच्या माध्यमातून गोदावरीत सोडावे तसेच या भागात ठिबक सिंचन अनिवार्य करावे, अशा सूनचाही या पत्रात करण्यात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा