निवडणुकीत किंमत मोजावी लागली तरीही चालेल पण मराठवाडय़ाला पाणी सोडावे, असा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यामागे राष्ट्रवादीची मराठवाडय़ात ताकद वाढविणे हा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा उद्देश असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. पाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे काँग्रेसेच जास्त नुकसान होऊ शकते.
शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसने १९८०च्या दशकात मराठवाडय़ात चांगला जम बसविला होता. मराठवाडय़ात पवार यांना मानणारा वर्ग मोठा होता. पवार हे काँग्रेसमध्ये परतल्यावर विरोधकांची निर्माण झालेली पोकळी तेव्हा शिवसेनेने मराठवाडय़ात भरून काढली. १९९४ मध्ये पवार हे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा नामविस्तार करण्यात आल्यावर मराठवाडय़ात पवारांच्या विरोधात जनमत गेले. तेव्हापासून मराठवाडय़ात पवार यांना आपले जुने वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करता आले नव्हते. पाणी या संवेदनशील विषय घेऊन राष्ट्रवादीने मराठवाडय़ात आपली ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात फक्त तीन टक्के पाण्याचा साठा झाला. मराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार हे स्पष्ट झाल्यावर पवार यांनी मोठय़ा खुबीने हा मुद्दा उचलला. एरवी पाण्यावरून आंदोलन, रास्ता रोको किंवा बंद होत असते. मराठवाडय़ात पाण्यावरून कोणतेही आंदोलन सुरू झालेले नसतानाही राष्ट्रवादीने नगर-नाशिकचे पाणी मराठवाडय़ात सोडले पाहिजे, अशी मागणी लावून धरली. मराठवाडय़ात पाण्याच्या प्रश्नाची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास अन्य भागातून पाणी सोडणे भाग पडणार आहे. पण आता तशी परिस्थिती  नसतानाही राष्ट्रवादीने पाण्याचा मुद्दा लावून धरला आहे.
मराठवाडय़ात विधानसभेचे ४६ मतदारसंघ असून, गेल्या वेळी राष्ट्रवादीचे १२ आमदार निवडून आले होते. पुढील विधानसभा निवडणुकीत १५ ते २० आमदार निवडून आणण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनाने मराठवाडय़ात काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अशोक चव्हाण हे ‘आदर्श’ घोटाळ्यात अडकल्याने अजूनही सावध भूमिका घेत आले आहेत. काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव आहे. याचाही फायदा उचलण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पाण्याचा मुद्दय़ावरून तापविल्यास राष्ट्रवादीला त्याचा फायदा होऊ शकतो. नगरचे पाणी सोडण्यावरून राष्ट्रवादीची नेतेमंडळी आक्रमक झाली आहेत. या भागातील पाणी सोडल्यास शिर्डी, श्रीरामपूर , राहुरी आणि सिन्नर (नाशिक) या चार मतदारसंघांमध्ये प्रतिक्रिया उमटू शकते. राहुरीमध्ये सध्या भाजपचा आमदार असून, उर्वरित तीन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. परिणामी मराठवाडय़ाच्या पाण्यावरून राष्ट्रवादीचे नगरमध्ये फारसे नुकसान होणार नाही. सारा फटका हा काँग्रेसलाच बसू शकतो.  निवडणुकीत किंमत मोजावी लागली तरी चालेल हा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला असला तरी त्याची किंमत राष्ट्रवादीला नव्हे तर काँग्रेसला मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली.