मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिरार्थींना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी हक्काचे घर द्यावे, या मागणीसाठी संक्रमण शिबिरातील रहिवासी २ जानेवारी रोजी म्हाडा भवनावर मोर्चा काढणार आहेत.
निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. या पुनर्विकासात येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या दोन इमारतींचाही समावेश करण्यात आला आहे. या संक्रमण शिबिरातील ८० कुटुंबांना अन्य संक्रमण शिबिरातील गाळे वितरीत करण्यात आले आहेत. आम्ही ४० वर्षांहून अधिक काळ संक्रमण शिबिरात राहत आहोत, आता आणखी किती वर्षे संक्रमण शिबिरात राहायचे ? असा मुद्दा उपस्थित करीत या संक्रमण शिबिरार्थींनी निर्मलनगर पुनर्विकासातच ८० जणांना कायमस्वरुपी हक्काची घरे द्यावीत, अशी मागणी करीत संक्रमण शिबिरातील गाळे रिकामे करण्यास नकार दिला. यासाठी काही जणांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय संक्रमण शिबिरार्थींच्या विरोधात गेला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्चा न्यायालयात आव्हान दिलेे. तसेच निर्मलनगर पुनर्विकासातच कायमस्वरुपी घरे देण्याच्या मागणीसाठी सकाळी १० वाजता म्हाडा भवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी नगरसेवक ॲड. मनमोहन चोणकर यांनी दिली.