युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कोठेच दिसत नाहीत अशी चर्चा काँग्रसेच्या वर्तुळात नेहमीच होत असताना राज्यातील दुष्काळी भागातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारपासून तीन आठवडय़ांची पदयात्रा काढण्यात येणार आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समस्या जाणून घेण्यासाठी जनतेमध्ये जावे, असा संदेश अ. भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. या पाश्र्वभूमीवर, राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा या उद्देशाने पदयात्रा काढण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी घेतला. ११ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात नऊ जिल्ह्य़ांमध्ये ५०० किमी पेक्षा जास्त अंतर युवक काँग्रेसचे हजारभर कार्यकर्ते पायी कापणार आहेत. या ‘संवाद यात्रे’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांचे दु:ख जाणून देण्याबरोबरच त्यांना मदत कशी मिळेल यासाठी पाठपुरावा करणे यावर भर देण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. दुष्काळग्रस्तांच्या भावना व त्यांनी दिलेली निवेदने सरकार दरबारी सादर केली जातील.
येत्या सोमवारी बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगाव येथून संवाद यात्रेला प्रारंभ होईल. अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राजीव सातव हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नगर, सातारा आणि सांगली अशा नऊ जिल्ह्य़ांमधून ही संवाद यात्रा जाणार आहे. ५ मार्चला सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी या दुष्काळी भागात पदयात्रेची समाप्ती होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एखाद्या गावात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळी भागावर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक लक्ष केंद्रित केल्याने या भागात सरकारी मदतीचे श्रेय काँग्रेसला मिळेल या दृष्टीने काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.

मुख्यमंत्री मंगळवारी मराठवाडय़ात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या मंगळवारी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्य़ातील दुष्काळी भागांना भेटी देणार आहेत. याच दिवशी औरंगाबादमध्ये मराठवाडय़ातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली आहे. दुष्काळी भागात जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यावर सरकारने भर दिला आहे.

Story img Loader