लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबईसह देशातील निवासी डॉक्टरांच्या आत्महत्यांप्रकरणी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने लक्ष घालावे अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय मार्डकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आले आहे.
रुग्णालयात रुग्णांची सेवा करताना डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांचा मूलभूत सन्मान राखला जावा, कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले असावे यासाठी सरकारच्या धोरणामध्ये आवश्यक बदल करण्यात यावा, अशी विनंती मार्डकडून मोदी यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
आणखी वाचा-झोपुतील सदनिका जवळच्या नात्यातील व्यक्तीला हस्तांतरित करणे आता सोपे
रुग्णालयात रुग्णांची सेवा करताना निवासी डॉक्टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कामाचे दीर्घ तास, सुट्ट्यांचा अभाव, वरिष्ठ डॉक्टरांकडून वारंवार मिळणारी अपमानास्पद वागणूक, रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणारी मारहाण, मानसिक ताणतणाव, अत्यंत वाईट अवस्थेतील वसतिगृह, निकृष्ट दर्जाचे जेवण, आर्थिक असुरक्षितता यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण हे दूषित झाले असून आहे. त्याचा परिणाम निवासी डॉक्टरांच्या कामावर होण्याची शक्यता असते. त्यातून निवासी डॉक्टर तणावाखाली येऊन आत्महत्यासारखे भयंकर पाऊल उचलत आहेत. महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील डॉक्टरांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
आणखी वाचा-अभिनेत्री क्रिसन परेरा भारतात परतली, शारजामध्ये अंमलीपदार्थ विक्रीचा खोटा गुन्हा
मुंबईतील केईएम रुग्णालयातील २७ वर्षीय डॉ. आदिनाथ पाटील यांनी मानसिक तणावाखाली इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. वरिष्ठांनी प्रबंध स्वीकारला नाही म्हणून भोपाळमधील २७ वर्षीय डॉ. बाला सरस्वती यांनीही भूल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची अतिरिक्त मात्रा घेऊन आत्महत्या केली. चंदीगडमध्ये सहाय्यक प्राध्यापकांनी तयार केलेल्या वातावरणामुळे एका निवासी डॉक्टराने आत्महत्या केली. या घटनांचा संदर्भ देत देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील परिस्थिती ही डॉक्टरांना निराश करणारी आहे. त्यामुळे चांगले डॉक्टर घडण्याऐवजी डॉक्टरच असहाय्यतेच्या गर्तेत ओढले जात आहेत. त्यातूनच वर्षानुवर्षे निवासी डॉक्टरांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. हा देशाच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेवरील डाग आहे. असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांचा मूलभूत सन्मान राखला जावा, कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले असावे यासाठी सरकारच्या धोरणामध्ये आवश्यक बदल करण्यात यावा, अशी विनंती मार्डकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर हे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय, महाराष्ट्राचे वैद्यकीय व शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पाठविले आहे.