मुंबई : मुंबई पालिकेच्या वैद्याकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या बीएमसी मार्डने गुरूवारी हातावर काळ्या फिती लावून काम करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णालय परिसरात डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी केली.

निवासी डॉक्टरांच्या तुलनेत अपुरी वसतिगृह, राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० हजार रुपये शिष्यवृत्ती वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयाची मार्च २०२४ पासून अंमलबजावणी करावी, दैनंदिन भत्त्यामध्ये वाढ करावी, वेतनाची थकबाकी तातडीने द्यावी, शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या नाश्ताचा थकीत भत्ता तातडीने द्यावा, या मागण्यांसाठी बीएमसी मार्डने वैद्याकीय महाविद्यालयाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांना स्मरण पत्र देत, २२ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.