लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तरवाहिनी मार्गिकेसाठी किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल शुक्रवार, १३ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. या पुलावरून सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे. तर, प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार व रविवारी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे एकूण ९२ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. या प्रकल्पातील उत्तरवाहिनी मार्गिका आणि वांद्रे – वरळी सेतूला जोडणाऱ्या दक्षिण वाहिनीवरील ८२७ मीटर लांबीचा पूल शुक्रवार, १३ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पुलाची गुरुवारी पाहणी केली. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून त्यात १२८ मीटर पोहोच रस्ता आणि ६९९ मीटर समुद्रातील पुलाचा समावेश आहे. या पुलामुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक जोडले गेले आहे. परिणामी, शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने थेट प्रवास करणे शक्य झाले आहे. प्रकल्पातील विविध मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू होत असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या सुमारे ७० टक्के वेळेसह ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत, मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला साधण्यासाठी दोन महाकाय तुळई स्थापन करण्यात आल्या आहेत. पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) २६ एप्रिल रोजी, तर वांद्रे – वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावरील दुसरी तुळई १५ मे रोजी सांधण्यात आली. उजव्या मर्गिकेवरील तुळईचे वजन दोन हजार मेट्रिक टन आणि डाव्या मार्गिकेवरील तुळईचे वजन तब्बल २ हजार ४०० मेट्रिक टन एवढे आहे.
सागरी किनारा रस्ता प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरबदल मार्गिकांचा समावेश आहे. तसेच, दक्षिण – उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे तयार करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाडीचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. भारतात प्रथमच या बोगद्यांमध्ये अत्याधुनिक सकार्डो वायूविजन प्रणाली वापरण्यात आली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर १० छेद बोगदे असून या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात येत आहे.
पुलाची गुरुवारी पाहणी करण्यात आली असून यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार आनंद अडसूळ, आमदार सदानंद सरवणकर, किरण पावसकर, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आदी उपस्थित होते.
आतापर्यंत प्रवासासाठी खुले करण्यात आलेले टप्पे
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात ११ मार्च रोजी बिंदूमाधव ठाकरे चौक ते मरीन ड्राईव्ह ही ९.२९ किलोमीटर लांबीची दक्षिणवाहिनी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर, १० जून रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीमार्गे लोटस जंक्शनपर्यंत ६.२५ किलोमीटर लांबीची उत्तरवाहिनी मार्गिका, तर, ११ जुलै रोजी हाजी अली ते वांद्रे-वरळी सागरी सेतूला जाण्याकरीता खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात येणारी ३.५ किलोमीटर लांबीची मार्गिका तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
तुळईच्या असमान उंचीमागील वस्तुस्थिती
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प व सागरी सेतू यांना जोडण्यासाठी दक्षिण व उत्तर या दोन्ही दिशेला प्रत्येकी एक तुळई स्थापन करण्यात आली आहे. संबंधित तुळई स्थापन केलेले ठिकाण वक्राकार स्थितीत आहे. वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या आंतरबदलातील मार्गिका क्रमांक – ३ ही उत्तर वाहिनीमध्ये समाविष्ट होते. त्यामुळे डाव्या मार्गिकेची रुंदी उजव्या मार्गिकेपेक्षा जास्त आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प मार्गिकेच्या दक्षिण आणि उत्तर वाहिनींचे संरेखन या पुलाजवळ वक्राकार आहे. त्यामुळे संरचनेच्या दृष्टिकोनातून डाव्या तुळईची उंची तांत्रिक कारणास्तव जास्त आहे.