महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीत आता घुसखोर आल्यास त्याची माहिती काही मिनिटांत नियंत्रण कक्षाला मिळू लागली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर लगेचच सागरी पोलीस, तटरक्षक दल आणि गरज भासल्यास नौदल आपल्या कारवाईस सुरूवात करू शकते. २६/११ च्या हल्ल्यानंतर गेल्या ५ वर्षांत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा हा परिणाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दहशतवादी हल्ल्यासाठी समुद्राचा वापर होऊ शकतो, असा सतर्कतेचा इशारा तब्बल २५० वेळा गुप्तचर यंत्रणेने दिला होता. या पाश्र्वभूमीवर आता सागरी हद्दीवरील जागरूकता वाढली आहे. परिणामी यापुढे समुद्राचा वापर करणे दहशतवाद्यांना कठीण जाणार असल्याचे या सुरक्षेच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तो निधी पुरविण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक त्या सागरी पोलीस ठाण्यांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.
याशिवाय गस्तीसाठी नौकाही उपलब्ध झाल्या असून ती चालविणारे चालक आणि त्यातून गस्त घालणारे खलाशी पोलीस यांच्या भरतीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रभावीपणे सागरी गस्त सुरू आहे. मच्छिमारही बारीकसारीक बाबी आम्हाला कळवित आहेत. आम्हीही त्याची खातरजमा करीत आहोत. पूर्वी सागरी पोलीस तसेच तटरक्षक दल आणि नौदलातून विस्तव जात नव्हता. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून परस्परांमधील समन्वय वाढला असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सद्यस्थिती
पहिल्या टप्प्यात १२ सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती अपेक्षित होती. त्यापैकी एनआरआय आणि मोरा ही नवी मुंबईतील दोन तर मुंबईतील सागरी एक पोलीस ठाणे वगळता उर्वरित पोलीस ठाण्याच्या इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आणखी सात सागरी पोलीस ठाण्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. उत्तन, अर्नाळा, केळवा, दाभोळ व पुनागढ (रत्नागिरी), दादर (रायगड) ही सागरी पोलीस ठाणी लवकरच कार्यान्वित होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा