मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांची शक्यता गुप्तचर यंत्रणाकडून व्यक्त केली जात असतानाच मुंबईसह राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षेबाबत अद्यापही फारशी सजगता बाळगली जात नसल्याचे दिसून येत आहे. किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या ६९ बोटींपैकी २३ बोटी नादुरुस्त असल्याची बाब समोर आली आहे. यात ११४ किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेल्या मुंबईतील २० पैकी १४ बोटींचा समावेश आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर बराच गाजावाजा करीत सागरी सुरक्षा व्यवस्थेचा बागुलबुवा निर्माण केला गेला असला तरी आजही स्थिती फारशी चांगली नसल्याचे राज्याच्या गृह खात्यानेच मान्य केले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर गृहखात्याने सादर केलेल्या अहवालाची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. त्यात या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. २६/११ च्या वेळी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतरही गेल्या सात वर्षांत सागरी सुरक्षेत फारशी प्रगती झालेली नाही. पावसाळ्यात सागरी गस्त बंद असते. परंतु या काळातच अधिकाधिक बोटी नादुरुस्त होतात आणि जेव्हा प्रत्यक्ष गस्त सुरू होते तेव्हा बोटी उपलब्ध नसतात, असे सागरी गस्तीची संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले.
सागरी सुरक्षेसाठी पोलिसांना तटरक्षक दलामार्फत प्रशिक्षण दिले जात असून आजवर नऊ वर्षांत ५६ तुकडय़ांमध्ये केवळ एक हजार ४११ पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वेगवान बोटी चालविण्यासाठी एक हजार चार पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात ४०९ पदेच भरण्यात आली आहेत. उर्वरित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ११ महिन्यांच्या कंत्राटाने घेतलेल्या खासगी ‘सेकंड क्लास मास्टर’ (६३) आणि ‘फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर’ (३५) यांच्यावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे.
मुंबईतील गस्तीची स्थिती भयावह असून सागरी पोलीस ठाणे एक हे माहीम फिशरमेन कॉलनीतून कार्यरत झालेले असले तरी सागरी पोलीस ठाणे दोनसाठी अक्सा चौपाटीवर जागा न मिळाल्याने बोरिवली पश्चिमेतील योगी नगर वसाहतीतून तात्पुरते काम सुरू आहे. या पोलीस ठाण्यांना कार्यकारी दर्जा अद्याप देण्यात आलेला नाही. सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना केंद्राने तीन तर राज्य शासनाने २३ जलद नौका पुरवल्या आहेत. या नौकांद्वारे यलोगेट आणि सागरी पोलीस ठाण्यांतील अपुऱ्या पोलिसांमार्फत गस्त सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन २६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्रकिनारी ७० तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. निर्मनुष्य जेट्टी, बेटे तसेच खाडीच्या परिसरात फिरती गस्त सुरू आहे. याशिवाय वर्षांतून दोनदा सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ‘सागर कवच अभियान’ राबविले जाते. नादुरुस्त बोटी वापरण्यायोग्य व्हाव्यात यासाठी दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे.
    -देवेन भारती, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था   

बिघाडनामा..
केंद्र शासन (गोवा शिपयार्ड) : ’मुंबई- कोयना, भीमा, पूर्णा (डाव्या इंजिनमध्ये बिघाड) ’नवी मुंबई- सुरक्षा ’पातळगंगा (गीअर बॉक्समध्ये बिघाड) ’पालघर- तुकाराम (इंजिनमध्ये बिघाड) ’रत्नागिरी- सागर शांती (डाव्या इंजिनमध्ये बिघाड)
राज्य शासन (मरिन फ्रंटियर्स) : ’मुंबई- मुंबई- १, मुंबई ३ ते ९ (डाव्या इंजिन, स्टार्टिंग तसेच इंजिन फेंडरमध्ये बिघाड) ’नवी मुंबई- तरंग (इंजिन बिघाड) ’ पालघर- ठाणे-३ (इंजिन बिघाड) ’रायगड- ३ (इंजिन गरम होतात) ’सिंधुदुर्ग- २ (गीअर बॉक्समध्ये बिघाड)
’जुन्या बोटी : प्रियांका, अबोली, शर्वरी, वशिष्टी (इंजिनमध्ये बिघाड)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marine security in danger