दहशतवाद्यांची सतत टांगती तलवार असलेल्या मुंबईला वेढणाऱ्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा पाहणाऱ्या पोलिसांपैकी ५० टक्के पोलिसांना पोहता येत नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर पोलिसांना सागरी गस्तीसाठी जावे लागते; परंतु पोहता येत नसल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानी होऊ शकते. हे टाळण्यासाठी आता सागरी सुरक्षेतील पोलिसांना समुद्रात पोहण्यासाठी आवश्यक असलेले खास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रशिक्षणाचा वेग फारच कमी असल्याचे आढळून येते.२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले होते. मात्र गेल्या सात वर्षांत सागरी सुरक्षेबाबत म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. सागरी सुरक्षेसाठी नेमल्या गेलेल्या दोन हजार १३४ पोलिसांपैकी तब्बल १२२५ पोलिसांना समुद्रात कसे पोहावे याचे प्रशिक्षण नसल्याची बाब उघड झाली आहे. तटरक्षक दलाकडून या पोलिसांना खास प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत फक्त ९१६ पोलिसांना तसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये शासनाने परिपत्रक काढून सागरी सुरक्षेत असणाऱ्या पोलिसांना समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु पोलिसांच्या नियुक्त्या करताना ही बाब लक्षात घेतली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुळात सागरी सुरक्षा हे कमी महत्त्वाचे खाते मानले जात असल्यामुळे स्वत:हून कुणीही या ठिकाणी नियुक्ती मागत नाही. त्यामुळे यापुढे नव्याने सेवेत भरती झालेल्या पोलिसांना सागरी सुरक्षेत घेऊन त्यांना खास समुद्री प्रशिक्षण देण्याचा विचार केला जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राज्यातील सागरी सुरक्षा धोक्यात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. राज्यातील ६९ पैकी २३, तर मुंबईतील २० पैकी १४ बोटी नादुरुस्त असल्यामुळे प्रत्यक्ष गस्तीच्या वेळी बोटी उपलब्ध नसल्याची बाबही उघड झाली आहे. या बोटी चालविण्यासाठी पोलिसांचीही कमतरता आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात खासगी कंत्राटाने भरती करण्यात आली आहे; परंतु सागरी सुरक्षा ही महत्त्वाची बाब असल्यामुळे खासगी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमण्यास आक्षेप घेण्यात आला आहे. महालेखापालांनी सादर केलेल्या अहवालातही त्याबाबत ताशेरे ओढण्यात आले आहेत.

सागरी सुरक्षेत काम करणाऱ्या सर्व पोलिसांना समुद्रात पोहता यावे, यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. पोर्ट विभागाचे उपायुक्त किरण चव्हाण यांच्या पुढाकाराने २६ पोलिसांची पहिली तुकडी बाहेर पडली. येत्या दोन महिन्यांत सर्व पोलिसांना पोहण्यासाठी आवश्यक ते खास प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– प्रताप दिघावकर, अतिरिक्त आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग

Story img Loader