मुंबई : हवामान बदल, नैसर्गिक आपत्तींमुळे कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहोर वाया गेला आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील मोहोरापासून तयार झालेले आंबे बाजारात आहेत. एप्रिलअखेर हापूसची आवक चांगली राहील. पण, मे महिन्यात आवक आणि बाजारातील उपलब्धता कमी होणार आहे. आंब्याला तीन टप्प्यात मोहोर येतो. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरमधील थंडीत मोठ्या प्रमाणावर मोहोर येतो. यंदा अपेक्षित थंडी पडली नाही. त्यात नर फुलांचे प्रमाण वाढल्यामुळे फळधारणा झाली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर पूर्णतः वाया गेला. डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मोहोर आला. आता मिळणारे आंबे डिसेंबरमधील मोहोरपासून मिळत आहेत. जानेवारीमध्ये येणाऱ्या तिसरा टप्पातील मोहोर वाढलेल्या तापमानामुळे वाया गेला आहे. जानेवारीतील मोहोरापासून मे महिन्यात आंबा मिळतो. त्यामुळे यंदा मे महिन्यात बाजारात कोकणातील हापूसची आवक कमी राहील. बाजारातील उपलब्धता कमी होऊन दरवाढ होऊ शकते, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा फळबागातदार संघाचे सदस्य विलास ठाकूर यांनी दिली.
नोव्हेंबर महिन्यात चांगला मोहोर येण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पाऊस न पडणे आणि नोव्हेबरमध्ये चांगली थंडी गरजेचे असते. यंदा नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत राहिला. थंडीही अपेक्षित पडली नाही. त्यामुळे मोहोर येण्यासाठी पोषक हवामान मिळाले नाही. मोहोर येण्याच्या काळात झाडांना पालवी फुटली. त्यानंतरही तापमान वाढ झाली. रात्रीच्या आणि दिवसांतील तापमानात १५ अंश सेल्सिअसहून जास्त फरक राहिला. त्यामुळे लहान फळे करपून गळून पडली. अवकाळी पावसामुळे फळांवर काळे डाग पडत आहे. फळमाशीचा प्रार्दुभाव वाढून आंब्याचे नुकसान वाढले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान वाढल्यामुळे आंबे कमी दिवसांत पक्व होऊन काढणीला आले आहेत. त्यामुळे बाजारात हापूसची आवक वाढली आहे. यंदा कोकणात हापूसचे उत्पादन सरासरीच्या जेमतेम ३० ते ३५ टक्केच होईल, अशी माहिती कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेता संघाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी दिली.
मुंबईत ७५ हजार पेटी हापूसची आवक
मुंबई बाजार समितीत कोकणातून गुरुवारी ७५ हजार पेटी हापूसची आवक झाली. सध्या १००० ते ३००० पेटीचा दर आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत आंबाची आवक सरासरीपेक्षा कमी राहिली. एप्रिलमध्ये सरासरी इतकी आवक राहील. मे महिन्यात फारशी आवक होणार नाही. गुजरातमध्येही आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात दर चढे राहतील, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd