लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याची अधिसूचना जारी झाली. नांदेडसह राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे किंवा संपण्याच्या मार्गावर आहे, अशा बाजार समित्यांची निवडणूक ११ एप्रिलपासून लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत बाजार समित्यांच्या संचालकांना मुदतवाढ मिळाली आहे. नांदेड जिल्ह्य़ात १९ बाजार समित्या आहेत.
नैसर्गिक आपत्ती, सार्वत्रिक निवडणूक अशा वेळी बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचे अधिकार सरकारला आहेत. या तरतुदीचा आधार घेत निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या असल्या, तरी ज्या बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, अशा व ज्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनाचा टप्पा पार करून गेली, अशा संस्था वगळून अन्य संस्थांची निवडणूक लांबणीवर टाकली जात असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
प्राधिकरण कागदोपत्रीच
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकारने स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेतला असला, तरी हे प्राधिकरण अजून कागदोपत्रीच आहे. प्राधिकरणातील वेगवेगळ्या पदांना मान्यता दिली असली, तरी पदांची भरती झाली नाही. नवीन कायद्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास डिसेंबर २०१३ ही मुदत आधी देण्यात आली. नंतर ती डिसेंबर २०१४ पर्यंत वाढविली. आता लोकसभेनंतर ४ महिन्यांनी राज्य विधानसभा निवडणूक आहे. ही बाब लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका नव्या वर्षांतच घेता येतील, असे दिसते.