लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : नाताळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईतील ठिकठिकाणच्या बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. नाताळनिमित्त लागणाऱ्या सजावटीच्या विविध वस्तूंनी दुकाने सजली आहेत. बाजारांमध्ये सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. ख्रिसमस ट्री, ख्रिस्त जन्माच्या देखाव्यासाठी गोठे, मुखवटे, सांताक्लॉजची टोपी इत्यादी साहित्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
दरवर्षी मुंबईसह सर्वत्र नाताळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांची घरे, प्रार्थनास्थळे आकर्षक रोषणाईने उजळून निघतात. त्याचबरोबर ख्रिस्तजन्माचा देखावा सर्वांचेच आकर्षण ठरते. दरम्यान, बाजारात बच्चे कंपनीचे खास आकर्षण असलेल्या सांताक्लॉजच्या विशिष्ट टोप्यांसोबतच यंदा हेडबॅंड्सनाही पसंती मिळत आहे. ग्राहक या आकर्षक टोप्या मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. तसेच सजावटीसाठी आवश्यक असणाऱ्या शोभेच्या वस्तूंचीही मोठी खरेदी केली जात आहे. लहान मुलांच्या मागण्यांना प्राधान्य देऊन त्याप्रमाणे खरेदी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आणखी वाचा-सायबर फसवणुकीतील १०० टक्के रक्कम परत मिळवण्यात यश, दहिसर पोलिसांची कारवाई
बाजारात लहान – मोठ्या सजावटी दिव्यांना मोठी मागणी आहे. त्यांची किंमत १०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. तसेच भेटवस्तू देण्यासाठी विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये शोभेच्या वस्तू मुख्य आकर्षण ठरत आहेत. तसेच दिव्यांच्या माळा सोडलेल्या विविध आकाराच्या काचेच्या बरण्याही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सांताक्लॉजचे चित्र असलेले छोटे कंदील, घंटा, तारा असे आदी उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते कांती साहू यांनी दिली. यांच्या किंमती १५० ते ७०० रुपयांपर्यंत आहेत.
दरम्यान, लहान-मोठ्या आकारातील ख्रिसमस ट्रीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. स्प्रिंग स्टॅॅण्ड, लाकडी स्टॅण्डवरील पिसांची झाडेही बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ख्रिसमस ट्री सजावटीसाठी लागणारे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये रंगीत काठ्या, कागदी माळा, चेंडू, दिव्यांच्या माळा आदींचा समावेश आहे. हे सजावटीच्या साहित्याची किंमत १०० रुपयांपासून ८०० रुपयांदरम्यान आहे.