लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी विविध प्रकारच्या सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी दादरसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती.

मुंबईतील नागरिकांनी बुधवारपासूनच दादर, कुर्ला, ठाणे आदी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुंबईतील बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी काही दिवस अगोदरच वाजतगाजत गणेशमूर्ती मंडपस्थळी स्थानापन्न केली, तर काही मंडळे गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती आणतात. गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यापासून पुढील १० दिवस षोडषोपचार पूजा आणि अन्य कार्यक्रमांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी वाटून घेतली आहे. त्यामुळे फारशी चिंता नसली तरी उत्सव सुरळीत पार पाडावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे फोर्टचा राजा मंडळाचे सचिव नयन डुंबरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा

मुंबईत १२ हजार मंडळे

मुंबईतील १२ हजारांहून अधिक सार्वजनिक, तर दोन लाख २४ हजारांहून अधिक घरगुती गणपतींची शनिवारी प्राणप्रतिष्ठा होत आहे.

ठाणे जिल्ह्यात २ लाख ५५ हजार २३ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना.

ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात घरगुती १ लाख ६० हजार ४६४ तर सार्वजनिक १ हजार ४३ गणेशमूर्तीची प्रतिष्ठपना होणार आहे.

नवी मुंबई शहरात सार्वजनिक ८८६ तर, घरगुती ९२,६३० इतक्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

(सुखकर्ता दु:खहर्ता असणाऱ्या गणेशाचे आगमन हा सर्वांसाठीच आनंदाचा, उत्साहाचा सोहळा. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने मूर्ती मंडपात आणली.)