मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ३६ प्रलंबित प्रकल्पांना एका रात्रीत मंजुरी देत सरकारने जवळपास २ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला. मात्र अन्नसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे सरकारच्या तिजोरीवर वाढणारा भार अर्थव्यवस्थेचे प्रतिक समजले जाणाऱ्या विविध वित्त बाजारांसाठी मंगळवारी असह्य़ ठरला. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन ६६ अशा नव्या नीचांकात रुतले; तर सेन्सेक्सनेही एकाच सत्रातील ६०० अंशांची घसरण दाखविली. हे कमी म्हणून की काय सराफा बाजारात सोन्याच्या दराने तोळ्यामागे ३२,५०० चा पुढचा पल्ला गाठत ऐतिहासिक उच्चांक नोंदविला.
रुपयाचा नवा तळ
डॉलरच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांपासून घरंगळत जाणारा रुपया मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारातच ६५ ते थेट ६६ पर्यंत घसरला. कालच्या तुलनेत १९४ पैशांनी खालावत स्थिरावलेला त्याचा ६६.२४ हा स्तरच दिवसाचा नीचांक ठरला. मंगळवारी नवा सार्वकालीन नीचांक नोंदविताना चलनाचा प्रवास ६५.०० ते ६६.२४ असा राहिला. ६५ च्या पुढील ६५.७१/७२ पर्यंतचा तळ अखेरचा असेल असे वाटू लागले असतानाच रुपया दिवसअखेर कालच्या तुलनेत ३.०२ टक्क्यांनी खालावला.
गुंतवणुकीला चालना
देशातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी गुंतवणुकीवरील मंत्रिमंडळ समितीने १.८३ कोटी रुपयांचे तीन डझन प्रकल्प एका रात्रीत मंजूर केले. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कात्रीत सापडलेल्या या प्रकल्पांमध्ये केवळ ऊर्जा क्षेत्रातलेच निम्मे प्रकल्प आहेत. तर उर्वरित प्रकल्पांमध्ये पायाभूत, रस्ते, रेल्वे आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

सेन्सेक्स १८ हजारांखाली
गेल्या सलग तीन सत्रातील वाढीने ६०० अंशांची भर घालणाऱ्या मुंबई शेअर बाजाराची वाटचाल मंगळवारी थांबतानाच दिवसअखेर याच प्रमाणात निर्देशांकाला आपटी अनुभवण्यास भाग पडली.
****
रुपयाच्या विक्रमी घसरणीने मुंबई निर्देशांकही १८ हजाराखाली तर निफ्टी ५,३०० च्या येऊन ठेपला. यामुळे गुंतवणूकदारांची संपत्तीदेखील एकाच दिवसातील व्यवहारात जवळपास २ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.
सोने ३२,६००!
भांडवली, चलन बाजारात घसरण सुरू असताना सराफा बाजारानेही अस्वस्थततेला साथ दिली. मुंबईत सोन्याचे दर १० ग्रॅममागे ३२ हजारांपुढे जात ३२,६०० नजीक जात नव्या ऐतिहासिक टप्प्याला जाऊन भिडले. तर चांदीच्या दरातही किलोमागे एकाच दिवसात एकदम २ हजार रुपयांची वाढ हा पांढरा धातू ५६,७०० पर्यंत पोहोचला.

सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांमध्ये सहमती असण्याची आवश्यकता आहे. सामायिक कार्यक्रम आणि योग्य कृती करून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
– पी. चिदम्बरम्, अर्थमंत्री

Story img Loader