लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: मालाड येथे पैशाच्या वादातून पतीची आजी व आत्याने केलेल्या मारहाणीत ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मृत महिलेच्या सासऱ्यानेच या दोन महिलांना तिला मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आयशा ऊर्फ हिना इरफान सय्यद (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ती मालाड येथील मालवणी परिसरात कुटुंबियांसोबत राहत होती. आयशा यांचे पती इरफान व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. इरफानने घर बांधण्यासाठी वडील अकबर सय्यद (५५) यांच्याकडून १० लाख रुपये उसने घेतले होते. पण ती रक्कम इरफानने परत न केल्यामुळे त्यांचे संबंध बिघडले होते.
हेही वाचा… कलाकारांनाही हवे ‘म्हाडा’चे घर
इरफानचा १४ वर्षांचा मुलगा धक्का मारून पळून आल्याचे कारण काढून अकबर, त्याची आई रुकय्या सय्यद (७०) व बहिण गौरी सय्यद (३५) गुरूवारी इरफानच्या घरी आले. त्यांनी इरफानची पत्नी हिनासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी इरफान व अकबर यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी गौरीने इरफानची पत्नी हिनाला केसाला धरून खाली पाडले. त्यावेळी अकबरने रुकय्या व गौरी या दोघींना हिनाला मारण्यास सांगितले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर गौरी व रुकय्याने हिनाच्या पोटावर व पाठीवर लाथा मारल्या. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गौरी व रुकय्या यांना मालवणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली.