घरात आर्थिक चणचण होती त्यामुळे घराच्या बाहेर पडले. मात्र जेमतेम शिक्षण झाल्याने नोकरी मिळणे कठीण झाले होते. त्यावेळी मैत्रिणीने टॅक्सीचालक प्रशिक्षणाबद्दलची माहिती दिली. वाहन चालविणे हे काम आव्हानात्मक होते, परंतु घरची परिस्थिती पाहता मी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्याचा निर्धार केला. आणि त्या प्रशिक्षणाच्या काळात माझा आत्मविश्वास दुणावला. घरातून विरोध होता, शेजाऱ्यांमध्ये नकारात्मक चर्चा होत होती. परंतु यातून मिळालेल्या पैशातून माझे घर सुरळीत चालत होते. काही महिन्यांपूर्वी टॅक्सीचालक म्हणून रुजू झालेली चंचला आज आनंदात आपल्या घरची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र सुरुवातीच्या काळात वाहतुकीच्या ज्ञानाअभावी अनेक पुरुष गाडीचालकांची बोलणी ऐकावी लागली. ‘तुम्हा बायकांनी घरच सांभाळा’, ‘गाडी चालविणे तुमचे काम नाही’ अशा अनेक नकारात्मक टीका पचवून काम करीत होतो. त्यावेळी समाजाच्या विश्वासाची आणि मदतीची गरज असल्याचे ती सांगते.
समाजाने निषिद्ध ठरवलेल्या अनेक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. यात टॅक्सीचालक म्हणून आज शंभराहून जास्त महिला मुंबईच्या रस्त्यांवर गाडी चालवताना दिसत आहेत. मात्र रोजगारासाठी वेगळे क्षेत्र निवडताना त्यांना सर्वाच्या मदतीची गरज असल्याची विनंती त्या समाजाकडून करीत आहेत. मारुती सुझुकी कंपनीने सुरू केलेल्या ‘उन्नती’ उपक्रमात टॅक्सी महिला चालक आपले अनुभव सांगत होत्या. चंचलासारख्या अनेक महिलांनी रोजगारासाठी टॅक्सीचालक यासारख्या वेगळ्या कामाची निवड केली आहे. यासाठी ग्रॅंट रोड येथील प्रियदर्शनी संस्थेत त्यांना गाडी चालविण्याच्या प्रशिक्षणाबरोबरच ग्राहकाशी बोलण्याची पद्धत, वाहतुकीचे नियम, स्वत:चा बचाव करण्यासाठीचे उपायही शिकविले जातात. त्यांना दिल्या जाणाऱ्या वाहनामध्ये जीपीएस, जीपीआरएस, मायक्रोफोन, ट्रॅकिंग व्यवस्था यासारख्या सुविधा आहेत. चूल आणि मूल यात अडकलेल्या अनेक महिला मुंबईच्या वाहतूक कोंडीमधून मार्ग काढीत सुसाट वेगाने आपले ध्येय पूर्ण करीत आहेत. प्रियदर्शनी संस्थेकडून कित्येक महिलांना स्वत:च्या मालकीची गाडी घेण्यासाठी आर्थिक सहकार्यही मिळाले आहे. मात्र वाहन चालविण्यासाठी मिळणाऱ्या प्रशिक्षणात वाहन शिकण्याबरोबरच स्वत:चा विकास करता आला. या कामामुळे आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे या महिलांनी सांगितले.
यासाठीच ‘मारुती सुझुकी’ या कंपनीने पुढाकार घेऊन उन्नती नावाचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये गरीब घरातील महिलांना चारचाकी वाहन शिकविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मारुती सुझुकी या कंपनीने आयोजित केलेल्या पहिल्या बॅचमधील आठ प्रशिक्षणार्थीचा परिवहन आयुक्त श्याम वर्धाने यांच्या हस्ते प्रमाणप्रत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गीता भोजक, मीनाक्षी जगताप, शाहीन खान, अफिफा शेख, कविता शेटय़े, वैशाली देवकर, चंचला भाटे, स्वाती बडेकर या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांना टॅक्सी चालविण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रियदर्शनी संस्थेच्या सुसीबेन शाहही उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा