कुर्ला पश्चिम परिसरातील लाकडाच्या गोदामांना बुधवारी पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.कुर्ल्याच्या कपाडिया नगर परिसरात मोठ्या प्रमाणात लाकडाची गोदामे असून याच गोदामांना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
हेही वाचा >>>समृद्धी महामार्गावरील सुविधांना विलंब?; फूड प्लाझा, अन्य सुविधांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ
अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तो पर्यंत या आगीत १८ ते २० गोदामे जळून खाक झाली होती. या गोदामांच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.