लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : चेंबूरच्या पी एल लोखंडे मार्ग परिसरात शुक्रवारी दुपारी एक वाजता हॉटेलला भीषण आग लागली. सुदैवाने त्या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र आगीत हॉटेलमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चेंबूर पश्चिम येथे पीएल लोखंडे मार्ग परिसर असून तेथील अमीर बाग परिसरात असलेल्या कुन पाया या हॉटेलला शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली होती. हॉटेलच्या स्वयंपाक घरात आग लागल्यानंतर तेथील कामगारांनी तत्काळ हॉटेल बाहेर धाव घेऊन अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.
मात्र या आगीत संपूर्ण हॉटेलमधील सामान जळून खाक झाले आहे. लोखंडे मार्ग हा मोठा दाटीवाटीचा परिसर असल्याने तेथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शुक्रवारी आग लागल्यानंतरही तेथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी दाखल होण्यास मोठया अडचणींना तोंड द्यावे लागले होते. मात्र पोलिसांनी वेळीच वाहतूक नियंत्रित करून तेथील रस्ते मोकळे केले.