लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मानखुर्द घाटकोपर जोडमार्गावरील मंडाळा परिसरातील भंगाराच्या गोदामांना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ६ ते ७ गोदामांचे मोठे नुकसान झाले.
मंडाळा परिसरातील एका गोदामात सुरुवातीला आग लागली होती. काहीच क्षणातच आग आसपासच्या गोदामांत पसरली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरू लागले. गोदामांलगतच अनेक झोपड्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित विभाग कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाली आणि मदतकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाने ७ वाजून ८ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. अग्निशामकांनी अनेक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलातर्फे ७ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास क्रमांक दोनची वर्दी देण्यात आली. अग्निशामकांकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.
आणखी वाचा-बोरिवलीत अनधिकृतपणे राडारोडा टाकणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
मानखुर्द – घाटकोपर जोडमार्गावरील मंडाळा परिसरात रासायनिक आणि भंगाराच्या कंपन्या आहेत. दरवर्षी ठराविक महिन्यात येथे आगीच्या घटना घडतात. याठिकाणी झोपड्यांचीही संख्या अधिक असल्याने समस्या आणखी तीव्र होते. सोमवारी मंडाळा परिसरात लागलेल्या भीषण आगीत सुमारे ६ ते ७ गोदाम जळून खाक झाले. गोदामांमधील विद्युत तारा, विद्युत यंत्रणा, प्लास्टिक आणि लाकडाच्या सामानाचेही मोठे नुकसान झाले.