लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : शीव येथील सुलोचना शेट्टी मार्गावरील पंचशील इमारतीला बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.
तीन मजली पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालय आणि बेस्ट उपक्रमातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य हाती घेतले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी देण्यात आली.
आणखी वाचा-ॲमेझॉनइतकेच अवाढव्य समुद्राखालचे जंगल? सहा देशांना जोडणाऱ्या या ‘समुद्री जंगला’त आहे तरी काय?
आगीमुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे अग्निशामकांना आग विझविण्यात अडचणी आल्या. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत सकाळी १० वाजून २० मिनिटांनी आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. इमारतीला आग लागताच रहिवाशांनी सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीबाहेर पळ काढल्यामुळे मोठी हानी टळली.