मुंबई : पवई येथील आग विझत नाही तोपर्यंत मुंबईत गुरुवारी अंधेरी परिसरातही आग लागल्याची घटना घडली. अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. दोन मजली इमारतीच्या गाळ्यातमध्ये ही आग लागली होती. आगीची तीव्रता जास्त असून अग्निशमन दलाने तीन क्रमांकाची वर्दी दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या व पाण्याचे आठ मोठे ट्रॅंकर घटनास्थळी आहेत.

मुंबईत दिवसभरात आगीच्या दोन घटना घडल्या. पवई येथील गगनचुंबी इमारतीत लागलेली आग पूर्णत: विझत नाही तोच अंधेरीतील एमआयडीसी परिसरात दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अंधेरी पूर्वेकडील महाकाली गुंफा मार्गावर शांती नगर परिसरात न्यू इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये एका दुमजली बांधकामात ही आग लागली होती.

दुमलजी बांधकामातील एका गाळ्यात ही आग लागली होती. एक हजार चौरस फूट परिसरात ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाबरोबरच, पालिकेच्या विभाग कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे. अग्निशमन दलाचा मोठा ताफा आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, एमआयडीसीमध्ये विविध उद्योगधंद्यांचे गाळे असून या ठिकाणी आग लागल्यास त्याची भीषणता जास्त असते. दीड वर्षांपूर्वी या परिसरात लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल बारा तास लागले होते. या परिसरातील गाळ्यांमध्ये विविध वस्तूंची गोदामे असतात. त्यात अनेकदा ज्वलनशील पदार्थही असतात. त्यामुळे अग्निशमन दलाने आधीच या तीन क्रमांकाची वर्दी दिली आङे.

Story img Loader