मुंबई : चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन कामगारांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

चेंबूरच्या मध्यभागी आलेल्या कलेक्टर कॉलनी परिसरात सध्या अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. येथील बीएसपी कार्यालयाच्या मागे एका इमारतीचे गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. दरम्यान बुधवारी दुपारी २ च्या सुमारास सातव्या मजल्यावर अचानक आग लागली. काही दिवसांपूर्वीच सातव्या मजल्यावर छताचे काम हाती घेण्यात आले होते. छताला आधार देण्यासाठी तेथे लाकडी बांबू आणि फळ्या लावण्यात आल्या आहेत. या लाकडी फळ्या आणि बांबुला आग लागली. क्षणातच आगीचा भडका उडाला.

आग लागली तेव्हा सातव्या मजल्यावर आठ ते दहा कामगार काम करीत होते. आग लागल्याचे समजताच त्यांनी तत्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली. त्यानंतर त्यांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र दोन कामगारांना किरकोळ इजा झाली. ही आग कशामुळे लागली ते समजू शकलेले नाही. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader