मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी ‘पर्सेटाईल’ शुन्यावर आल्यानंतर विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात अनेक महाविद्यालयांनी मोठय़ा प्रमाणात शुल्कवाढ केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही शुल्कवाढ वर्षांला २ ते २० लाख रुपयांच्या घरात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र शासनाने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशाचे निकष शिथिल केल्यामुळे उणे ४० गुण मिळालेले डॉक्टर्सही पदव्युत्तर प्रवेशासाठी पत्र ठरले आहेत. त्यामुळे एरवी जागा रिक्त राहणाऱ्या विषयांसाठीही विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले. आता नियमित फेऱ्या झाल्या असून संस्थास्तरावरील प्रवेश फेरीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना महाविद्यालयांनी मोठय़ा प्रमाणावर शुल्कवाढ केली आहे. बहुतेक खासगी पदव्युत्तर महाविद्यालयांचे शुल्क हे प्रतिवर्ष दहा लाख रुपयांच्या पुढे आहे. आता त्यात २ लाख रुपये ते २० लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.  पुण्यातील एका महाविद्यालयाचे पॅथॉलॉजी विषयाचे शुल्क साधारण १५ लाख रुपयांवरून ३७ लाखांवर पोहोचले आहे. पॅथॉलॉजीचेच सोलापूर येथील  एका महाविद्यालयाचे शुल्क साधारण ११ लाख रुपयांवरून २५ लाख रुपये झाले आहे.

हेही वाचा >>>मुंबई : विनातिकीट प्रवाशांकडून ८१.१८ कोटी रुपये दंड वसूल

रत्नागिरी येथील एका महाविद्यालयाचे भूलशास्त्र विषयाचे शुल्क २२ लाख रुपायांवरून साधारण ४१ लाख रुपये करण्यात आले आहे. इतरही महाविद्यालयांमध्ये अशाच स्वरूपाची शुल्कवाढ दिसते आहे.

आर्थिक क्षमताच वरचढ?

विद्यार्थ्यांनी वाढलेल्या शुल्काची माहिती घेऊनच प्रवेश निश्चित करावेत, अशा आशयाची सूचना प्रवेश नियमन समितीने दिली आहे. आधीच जागा भरण्यासाठी पात्रता निकष शिथिल करून गुणवत्तेशी केलेली तडजोड केल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे. त्यातच आता भरमसाट शुल्कवाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेपेक्षा आर्थिक क्षमता वरचढ ठरणार असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive increase in fees of colleges for medical post graduation mumbai amy
Show comments