लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : धोकादायक जुन्या इमारतींचा पुनर्विकास न झाल्याने हक्काच्या घरापासून वंचित राहिलेल्या रहिवाशांची बृहद्सूची (मास्टर लिस्ट) नव्याने अद्ययावत केली जाणार आहे. बृहद्सूचीवरील रहिवाशांना प्राधान्याने घर मिळावे यासाठी ही यादी अद्ययावत करून यापुढे फक्त ॲानलाईन सोडतीतूनच घर वितरीत केले जाणार आहे.
शहरातील धोकादायक झालेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळ वा खासगी विकासकामार्फत केला जातो. मात्र काही जुन्या इमारतींचे भूखंड छोटे वा आरक्षणामुळे विकसित होणे अशक्य असते. अशा इमारतींतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पर्यायी जागा दिली जाते. त्याचवेळी त्यांचे नाव बृहद्सूचीमध्ये समाविष्ट केले जाते. या रहिवाशांना इमारत दुरुस्ती मंडळाने पुनर्रचित केलेल्या वा खासगी विकासकाने पुनर्विकसित केलेल्या इमारतीत उपलब्ध असलेल्या अतिरिक्त सदनिका वितरित केल्या जातात. बृहद्सूचीवरील रहिवाशाला अशा सदनिका वितरीत करण्याची पूर्वी पद्धत होती. परंतु बृहद्सूचीवरील रहिवाशांचा क्वचितच अशा सदनिकांसाठी विचार केला जात होता. त्यामुळे पुनर्रचित वा पुनर्विकसित इमारतीत सदनिका उपलब्ध असली तरी ती बृहद्सूचीवरील रहिवाशाला मिळत नव्हती. बृहद्सूची कमी होण्याऐवजी वाढतच होती. प्रामुख्याने दलालांकडून या रहिवाशांच्या फायली विकत घेऊन त्या खासगी व्यक्तींना विकल्या जात होत्या. इमारत व दुरुस्ती मंडळातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार अनेक वर्षे सुरू होता.
आणखी वाचा-मुंबई पारबंदर प्रकल्प २५ डिसेंबर रोजी वाहतूक सेवेत? भाजपाची ट्विटरवरून लोकार्पणाची घोषणा
दुरुस्ती मंडळाच्या मुख्याधिकारीपदी सतीश लोखंडे यांची नियुक्ती झाली तेव्हा पहिल्यांदा बृहद्सूची ॲानलाईन करण्यात आली. त्यामुळे ९६ रहिवाशांना घरे मिळू शकली. त्यानंतर मात्र बृहद्सूचीअंतर्गत घर वितरणावर कुठलेही नियंत्रण राहिले नाही. बृहद्सूची समिती असूनही दलालांची मक्तेदारी सुरू होती. याची कल्पना आल्यानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी वितरणाला स्थगिती दिली. ही सर्व प्रक्रिया ॲानलाईन करून दलालांचा हस्तक्षेप कसा कमी करता येईल, याबाबत योजना तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर म्हाडा उपाध्यक्षांनी आता वितरणावरील स्थगिती उठविली असून ही संपूर्ण प्रक्रिया ॲानलाईन केली आहे.
आता ॲानलाईन सोडतीद्वारे बृहद्सूचीवरील रहिवाशांना घरांचे वितरण होणार आहे. याबाबत आता नव्याने बृहद्सूची तयार केली जात आहे. या बृहद्सूचीतील तपशील नव्या प्रक्रियेत समाविष्ट केला जाणार असून त्यानंतर सोडतीने घरांचे वितरण होणार आहे. सोडतीद्वारे घराचा संपूर्ण तपशील उपलब्ध केला जाणार असल्यामुळे दलालांना हस्तक्षेप करता येणार नाही, असा दावा म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.