गर्भावस्थेतील काळजी, जनजागृती, सुरक्षित प्रसूतीचा परिणाम
मुंबई : गर्भावस्थेतील महिलांची प्रसूतीदरम्यान घेण्यात येणारी काळजी आणि प्रसूतीमधील संभाव्य धोक्यांबाबतची जनजागृती यांमुळे गेल्या वर्षभरात मुंबईतील माता मृत्यूदरामध्ये सुमारे २५ टक्क्यांची घट झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दर एक लाख नवजात शिशूंच्या प्रमाणात मातांच्या मृत्यूचे प्रमाण २०१६ साली १९९ इतके होते. ते प्रमाण २०१७मध्ये १५३वर आले असून गेल्या चार महिन्यांमध्ये हे प्रमाण ११५पर्यंत खाली घसरले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गरोदर अवस्था आणि प्रसूती याबाबतची जनजागृती मोठय़ा प्रमाणात होत आहे. यामध्ये पालिकेची आरोग्यकेंद्राचा सहभाग तर आहेच परंतु ‘एम-मित्र’ या मोबाइल सुविधेमुळेही गरोदर महिलांमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच पूर्वी प्रसूतीच्या काळामध्ये धोकादायक स्थिती निर्माण झाली की बहुतांश रुग्णालयांमधून शीव रुग्णालयामध्ये पाठविण्यात यायचे. त्यामुळे रुग्णालयाचा ताणदेखील वाढत होता. तेव्हा कोणत्या रुग्णालयांनी कोणत्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला पाठवायचे याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळेदेखील प्रसूतीदरम्यान आणि त्यानंतरही महिलांची योग्य काळजी घेणे शक्य झाले आहे. यामुळे माता मृत्यू दर तर कमी झालाच आहे यासोबतच अर्भक मृत्यू दराचे प्रमाणही घटलेले आहे, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगेश्वर नंदनवार यांनी सांगितले.
मुंबईमध्ये मागील तीन वर्षांमध्ये मातामृत्यूच्या प्रमाणामध्ये घट होत असून २०१५, २०१६ आणि २०१७ या वर्षांमध्ये अनुक्रमे ३१६, ३०५ आणि २३६ अशी माता मृत्यूंची नोंद करण्यात आली. जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ५७ मातांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे. मुंबईत जन्मणाऱ्या एक लाख शिशूंच्या तुलनेत या मातामृत्यूंच्या संख्येचे समीकरण पाहता माता मृत्यूदर घसरत चालल्याचे आश्वासक चित्र उभे राहिले आहे.
मातामृत्यूच्या घटना, त्यांची कारणे याबाबतच्या बैठकांचे नियोजन करून त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे मृत्यू दर कमी करणे शक्य झालेले आहे, असे उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोरे यांनी सांगितले. एकूण माता मृत्यूच्या प्रमाणामध्ये मुंबईतील आणि मुंबईबाहेरून प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांची एकत्रित आकडेवारी आहे. त्यामुळे ही आकडेवारी अधिक जास्त असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात मुंबईत मातामृत्यूचे प्रमाण या एकूण आकडेवारीच्या जवळपास निम्मे असल्याचेही पुढे डॉ. गोरे यांनी सांगितले.