बीजगणित-भूमितीतील सरळ व्याज, बैजिक राशी, वर्ग-वर्गमूळ, घातांक.. नाव घेतले तरी शाळेत गणिताने आपला कसा ‘घात’ केला याच्या आठवणी बऱ्याच निघतील. पण, गणितातील याच किचकट संकल्पना मुळातून समजून घेणेच नव्हे तर त्यांच्याशी खेळायला मिळाले तर..! तसे भाषा, विज्ञान, भूगोल खेळाच्या माध्यमातून शिकल्याचे आपण अनेकदा ऐकतो. पण, गणिताशी खेळायचे म्हटले की परीक्षेत झालेला ‘खेळखंडोबा’च आठवतो. गणिताविषयीची विद्यार्थ्यांची होणारी नेमकी हीच अडचण ओळखून वांद्रे येथील एका शाळेने मुंबईतील विद्यार्थ्यांकरिता गणिताचे ‘खेळ’ मांडण्याचे ठरविले आहे.
वांद्रय़ाच्या सरकारी वसाहतीत वसलेली ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’ ही प्रयोगशील शाळा दरवर्षी आपल्या मुलांकरिता गणिताचे हे खेळ प्रदर्शन भरवीत असते. परंतु, आता हे प्रदर्शन मुंबईतील इतर विद्यार्थ्यांना आणि गणित शिक्षकांकरिताही भरविण्याचे शाळेने ठरविले आहे. विज्ञान किंवा इतर विषयांवरील प्रदर्शने नेहमीच भरतात. परंतु, गणित सोपे करून सांगणाऱ्या गणिताचे खेळांचे प्रदर्शन हे बहुधा पहिलेच असावे, असे शाळेचे संचालक मिलिंद चिंदरकर यांनी सांगितले. यात गणिताची कोडी, डॉमिनोज (प्रश्न-उत्तराची कार्डे जुळविणे), मॉडेल, कार्यपत्रिका, सुडोको अशा विविध खेळांचे आयोजन यात करण्यात आले आहे. दहा वर्षांपूर्वी शाळेने गणिताची प्रयोगशाळा तयार केली. या प्रदर्शनात ही प्रयोगशाळा तयार करण्यासंबंधीही शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठय़पुस्तकात असलेल्या गणितीय संकल्पना खेळाच्या माध्यमातून समजून घेता येतील. हे खेळ शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनीच तयार केले आहेत. आणि तेच बाहेरील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत. यात शिक्षकांकरिता शिकविण्याकरिता, सरावासाठी, संकल्पनांचे दृढीकारण करण्यासाठी उपयोगी ठरतील अशी शैक्षणिक साधनेही असणार आहेत.
एखाद्या विषयाविषयी भीती वाटत असेल तर शिकण्यातील रस कमी होऊन तो लांबलांब पडतो. पण, तोच जर विषय आवडायला लागला की सोपाही वाटतो आणि त्याच्या शिकण्यातून आनंदही मिळविता येतो. गणिताविषयी म्हणायचे तर तो शत्रू नसून झालाच तर मित्र आहे. एरवी विद्यार्थ्यांना गणिते सोडवायला सांगितली की त्यांच्या कपळाला आठय़ा पडतात. पण, या खेळांमधून अगदी पन्नासएक गणिते सहज सोडवितात.
मिलिंद चिंदरकर
काय खेळाल?
नफा-तोटा, संख्यावाचन, दशांश-पूर्णाक, अपूर्णाक, लसावी-मसावी, शेकडेवारी, कोन, वर्तुळ, चौकोन, महत्त्वमापन, भौमितिक रचना, इत्यादी संकल्पना. गणिताची लॅब १० वर्षे आहे.
कधी खेळाल?
२१ आणि २२ डिसेंबर
सकाळी ७ ते दुपारी १२.३० – पाचवी, सहावी, सातवी
दुपारी १२.३० सायंकाळी ६ – आठवी, नववी
कुठे खेळाल?
महात्मा गांधी विद्या मंदिर,
सरकारी वसाहत, वांद्रे