मध्य रेल्वेचा भाडेवाढीचा प्रस्ताव; पावसाळ्यानंतर गाडी सुरू करण्याचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माथेरानची राणी’ अशी ओळख असलेल्या माथेरानच्या ‘मिनी ट्रेन’चा प्रवास महागणार आहे. गेल्या वर्षभरापासून बंद असलेली मिनी ट्रेन पावसाळ्यानंतर सुरू करण्याचे मध्य रेल्वेचे प्रयत्न असून गाडी सुरू होताच प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागेल. १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत भाडेवाढीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.

माथेरानमध्ये येताच प्रथम पर्यटक मिनी ट्रेनच्या प्रवासाचा आनंद लुटतात. तसेच माथेरानमध्ये राहणाऱ्या स्थानिकांसाठीही एक वाहतुकीचे साधन झाले आहे. तोटा होत असतानाही मध्य रेल्वेकडून मिनी ट्रेन पर्यटक आणि स्थानिकांसाठी चालवली जाते. ही गाडी चालवण्यासाठी मध्य रेल्वेला दरवर्षी २० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. गाडी सुरू राहावी यासाठी अर्थसाहाय्यही अन्य संस्थांकडून प्राप्त झाले आहे. यात मध्यंतरी गाडी सुरू ठेवण्यासाठी २००९ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रेल्वेला १० कोटी रुपयांची मदतही केली होती. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून निधी प्राप्त झाला होता. अशी ही मिनी ट्रेन सध्या बंदच ठेवण्यात आली आहे. जानेवारी २०१६ ते मे २०१६ या काळात माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या सहा घटना घडल्या होत्या. यात दोन घटना रुळावरून डबे घसरल्याच्या होत्या. दोन्ही घटनांमध्ये डबे दुसऱ्या बाजूला असलेल्या दरीत कोसळले असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा बंदच ठेवली. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानंतर सुरक्षा उपाययोजनांसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि संरक्षक भिंत याचबरोबर मिनी ट्रेनच्या इंजिनाला एअर ब्रेक प्रणालीसारखी यंत्रणा बसवण्याचे कामही केले गेले. सध्या संरक्षक भिंतीचे काम केले जात आहे. चार ते पाच महिन्यांत माथेरान मिनी ट्रेन सुरू केली जाईल, अशी माहिती वारंवार मध्य रेल्वेकडून दिली जात असतानाच त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मात्र मिनी ट्रेन पावसाळ्यानंतर सुरू करण्याच्या हालचाली रेल्वेकडून होत असून त्यासाठी नवीन भाडेदरही ठरवण्यात आले आहे. मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पर्यटकांना किंवा स्थानिकांसाठी दुसऱ्या श्रेणीचा डबा, जनरल डबा, आरक्षित डबा आणि प्रथम श्रेणीचा डबा असून यासाठी वेगवेगळे भाडेदर आकारण्यात येतात. या भाडय़ात १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे दुसऱ्या श्रेणीच्या प्रवासासाठी नवीन भाडेदरानुसार ६० रुपये, तर जनरल डब्यातील प्रवासासाठी ४० रुपये द्यावे लागतील. तर प्रथम श्रेणीच्या प्रवासासाठी २८५ रुपये द्यावे लागणार आहे.

एसटी महामंडळाकडून साधारणपणे ऑक्टोबर २०१६ पासून कर्जत ते माथेरानदरम्यान १६ बसफेऱ्या स्थानिक आणि पर्यटकांसाठी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार फेऱ्याही चालवण्यात आल्या. यातील कर्जत ते माथेरानसाठी ३० रुपये आणि नेरळ ते माथेरानसाठी २५ रुपये तिकिट दर आकारले जाते. मात्र या फेऱ्यांना प्रतिसादच मिळत नसल्याने अखेर ६ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.