मुंबई : मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाचा कारभार महिला कर्मचारी यशस्वीरित्या सांभाळत असून महिला कर्मचारी कारभार सांभाळत असलेले माटुंगा स्थानक भारतातील पहिले स्थानक ठरले आहे. याबद्दल माटुंगा स्थानकाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या स्थानकाचा कारभार ३२ महिला रेल्वे कर्मचारी सांभाळत आहेत.

माटुंगा स्थानकात १६ बुकिंग क्लर्क, ९ तिकीट तपासणीस, ६ ऑपरेटिंग स्टाफ, आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) कर्मचारी, पॉइंट्समन आणि सफाई कर्मचारी अशा ३२ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिकीट विक्री, तपासणी, सुरक्षा, लोकल सेवा सुरळीत करणे, स्थानकाची देखभाल यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या महिला कर्मचारी लिलया पेलत आहेत. महिला सक्षमीकरणाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.

माटुंगा स्थानकाच्या व्यवस्थापक म्हणून सारिका सावंत कारभार सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानकातील सर्व कामकाज सुरू आहे. लोकल सेवा योग्यरित्या धावणे व इतर सर्व रेल्वेचा कारभाराची जबाबदारी सावंत यांच्या खांद्यावर आहे. मुख्य तिकीट निरीक्षकपदी मनाली पाटील असून त्यांच्या नेतृत्वाखालील महिला तिकीट तपसणी कर्मचाऱ्यांचे पथक स्थानकातील सर्व प्रवाशांची तिकिटे तपासण्याचे काम करते. रेल्वे स्थानक परिसरात विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही त्यांच्याकडून केली जाते.

Story img Loader