मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नरोन्हाचे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी संबंध होते, असे दिसून येत आहे. या गोळीबारप्रकरणी अधिक माहिती पोलिसांकडून घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने थेट पोलीस ठाण्यातच राजकीय विरोधकावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्यानंतर ठाकरे गटातील घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचे फेसबुक लाइव्ह करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असला तरी त्यामागे राजकीय धागेदोरेही आहेत का, याबाबतही चर्चा सुरू आहे. दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांचे शवविच्छेदन जे.जे. रुग्णालय येथे होणार असून मॉरिस नरोन्हा याचे शवविच्छेदन कूपर रूग्णालय येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरोन्हा हा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये कार्यरत नव्हता, हे प्राथमिक माहितीवरून दिसून येत असून तो आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत काही सामाजिक कामे करीत होता. करोनाकाळात नोरोन्हाने सामाजिक संस्थेद्वारे कार्य सुरू केले होते. एका प्रकरणात नरोन्हाविरुद्ध घोसाळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या रागातून नोरोन्हाने गोळीबार केला का, हे तपासण्यात येत आहे. मात्र नरोन्हाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप खासदार गोपाळ शेट्टी, आमदार गीता जैन आदी राजकीय नेत्यांबरोबरची जुनी छायाचित्रे प्रसिद्धीमाध्यमे व समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहेत. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसला, तरी नेत्यांकडे त्याचे जाणे-येणे होते, अशी माहिती पुढे आली आहे. आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्याने काही नेत्यांना आमंत्रित केले होते. राज्यात राजकीय नेत्यांवर गोळीबाराच्या घटना काही दिवसात घडल्या आहेत. उल्हासनगर मध्ये भाजपच्या आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला आहे. या गोळीबाराच्या निमित्ताने परवानाधारक शस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर आला असून आमदार गायकवाड यांनी आपल्याकडील परवानाधारक शस्त्र गोळीबारासाठी वापरले होते, तर मॉरिसकडे असलेले शस्त्र हे परवानाधारक होते की बेकायदेशीर याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा >>>Abhishek Ghosalkar Shot Dead : “आधी अंधार केला, मग कार्यालयात नेलं अन्….”, प्रत्यक्षदर्शीने सांगितला घोसाळकर यांच्या हत्येचा थरारक घटनाक्रम

यासंदर्भात खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद केले. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असून रागावर नियंत्रण न ठेवल्याने हा गोळीबार झाला आहे. यामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

फेसबुक लाइव्ह दरम्यान गोळीबार

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबारापूर्वी मॉरिस भाई याने फेसबुक लाइव्ह केले होते. आम्हा दोघांना एकत्र पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण आयसी कॉलनीच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये सांगितले. सुमारे साडेचार मिनिटे दोघेही एकत्र बोलल्यानंतर मॉरिसने त्यांच्यावर गोळीबार केला. फेसबुक लाइव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. काही वेळानंतर हा प्रकार कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्या सर्वांनी घोसाळकर यांना रुग्णालयात नेले.

राज्यात गुंडांचे सरकार आदित्य ठाकरे

राज्यात गुंडांचे सरकार असून कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. काय चालले आहे, हेच कळत नाही. जळगावमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यावर गोळीबार झाला तर उल्हासनगरमध्ये आमदाराने खुलेआम पोलीस ठाण्यात गोळीबार केला आहे. आता मुंबईत गोळीबार झाला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा >>>“अभिषेकचा बळी घेणारा मोरिस चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर, आता फडणवीसांनी…”, संजय राऊत यांची मागणी

‘गुंडाराज उलथून टाकण्यासाठी संघटित व्हा’

राज्यात दिवसाढवळ्या गोळीबार, अत्याचार, असह्यतेमुळे आमदाराकडून पोलीस ठाण्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. मंत्रालयात गुंड चित्रफिती तयार करत आहेत. या सगळ्या प्रकाराने महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यामुळे हे मिंधे सरकार उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी कल्याण पूर्वेतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा भेटी दरम्यान केले.

शस्त्र परवाना कसा मिळतो?

शस्त्र परवाना काढण्यासाठी ठरावीक नमुन्यातील अर्ज भरून तो पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल करावा लागतो. बहुसंख्य परवाने संरक्षणाचे कारण देऊन घेण्यात येतात. याशिवाय शेतीच्या पिकाच्या संरक्षणासाठीही अग्निशस्त्र परवाना मिळतो. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे. अग्निशस्त्र परवान्यासाठी रहिवासी पुरावा, छायाचित्र, कोणते अग्निशस्त्र घेणार याची माहिती, दोन व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्याकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्नाचा दाखला, जन्म प्रमाणपत्र तसेच शस्त्रासाठी आवश्यक असलेल्या कारणाची माहिती आदी गोष्टी पोलिसांना द्याव्या लागतात. शॉटगन, हँडगन आणि स्पोर्टगन या तीन प्रकारच्या बंदुकासाठी परवाना मिळतो. अर्जानंतर पोलीस मुख्यालयात प्रक्रिया सुरू होते. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास तपासला जातो. स्थानिक पोलिसांकडून अहवाल मागवला जातो. त्याबाबत मुंबईत विशेष शाखा तर स्थानिक पातळीवर संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. यावेळी अर्ज करणाऱ्याची मुलाखतही घेतली जाते. अधिकारीदेखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.

दहिसर हे कार्यक्षेत्र

मुंबई महानगरपालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अभिषेक घोसाळकर दहिसरमधील प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. मात्र २०१७ मधील पालिका निवडणुकीच्या वेळी प्रभाग क्रमांक १ महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन प्रभाग क्रमांक १ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maurice naronha firing on abhishek ghosalkar out of animosity dahisar mumbai amy
Show comments