माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या मॉरिस नावाच्या गुंडाने केली त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. ही धक्कादायक घटना दहीसरमध्ये घडली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारवर टीका केली जाते आहे. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात गुंडाराज असून या प्रकरणी आता गृहमंत्रीपदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे. दुसरीकडे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी घटनेचा संपूर्ण थरार काय होता ते सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक घोसाळकरांना मॉरिसने सकाळी ११ वाजता फोन केला होता. महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे हे त्याने अभिषेक घोसाळकर यांना सांगितलं होतं. तसंच गेल्या काही महिन्यांपासून स्वतःला समाजसेवक म्हणवणारा मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांच्याशी जवळीक वाढवली होती. मात्र संध्याकाळी सातच्या दरम्यान काय घडलं तो थरार लालचंद पाल यांनी सांगितला आहे. लालचंद पाल हे घटनास्थळी उपस्थित होते.

काय म्हटलंय लालचंद पाल यांनी?

“अभिषेक घोसाळकर यांची शाखा बोरीवलीत आहे. अभिषेक सर संध्याकाळी ६ च्या दरम्यान कार्यालयात आले होते. आम्हाला मॉरिसकडे जायचं होतं. त्यानुसार आम्ही त्यांच्यासह मॉरिसच्या ऑफिसमध्ये गेलो. मॉरिसने अभिषेक सरांना आतल्या केबीनमध्ये नेलं. तिथे मी पण जाणार होतो. पण मॉरिस म्हणाला तुम्ही जरा बाहेर थांबा. पंधरा वीस मिनिटांनी मॉरिस आला. त्याला आम्ही विचारलं वेळ लागणार आहे का? तर मॉरिस म्हणाला थोडं थांबा मी आणि अभिषेक घोसाळकर फेसबुक लाइव्ह करतो. त्यानंतर आपल्याला साडी वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे. मी त्याला ठीक आहे म्हटलं. त्यानंतर पाच-दहा मिनिटांनी मॉरिस म्हणाला मेहुलला येऊ दे मग आपण कार्यक्रम करु. तिकडे मेहुल आला पण काय झालं माहीत नाही तो दहा मिनिटांनी निघून गेला.”

आणि मी पाहिलं, मॉरिसने गोळ्या झाडल्या

“मेहुल गेल्यानंतरही अभिषेकसर मॉरिसच्या केबीनमध्येच बसले होते. मी त्यांना फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. म्हणून मी मॉरिसच्या केबीनमध्ये गेलो. मी दरवाजा उघडला तेव्हा मी पाहिलं की मॉरिस आणि अभिषेकसर फेसबुक लाईव्ह करत होते. तेव्हा मला मॉरिसने सांगितलं पाच मिनिटं थांब आम्ही आलो. या सगळ्यात सात ते सव्वासात झाले होते. मी रस्ता क्रॉस करुन समोर आलो तितक्यात मला गोळीबाराचा जोरदार आवाज आला. त्यानंतर काच फुटली. मी धावत जाऊन पाहिलं तर मॉरिसच्या हातात बंदूक होती आणि अभिषेकसर दरवाजाच्या बाहेर पडले. मॉरिसला बंदूक घेतलेल्या अवस्थेत पाहून मी घाबरलो, मी जोरात ओरडलो. आमच्या कार्यकर्त्यांना हाका मारल्या. आम्ही रिक्षा करुन अभिषेकसरांना करुणा हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो. प्रवीण आणि चेतन हे आमचे कार्यकर्तेही आमच्याबरोबर होते. त्यानंतर पोलीस आले. मॉरिसचं काय झालं ते माहीत नव्हतं. मात्र अभिषेक घोसाळकरांबरोबर जे घडलं ते चुकीचं होतं. ” असं प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणाऱ्या मॉरिसची स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या

नेमकी काय घडली घटना?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दहिसर या ठिकाणी ही घटना घडली. यानंतर गोळीबार करणाऱ्या मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि त्याचं आयुष्य संपवलं. तर अभिषेक घोसाळकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mauris narohna fired at abhishek ghosalkar i saw the gun in his hand said lalchand pal scj