मुंबई : महायुतीच्या विद्यमान सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी करत आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. करोनाचे संकट, केंद्र सरकार व राज्यपाल यांच्या माध्यमातून सतत अडवणूक करण्यात येत होती. तरीसुद्धा यावर मात करत गुंतवणूक व रोजगार निर्मितीत ‘मविआ’ सरकारने महायुती सरकारपेक्षा सरस कामगिरी केली, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला.
माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या ३० महिन्यांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या सरकारच्या काळात राज्यात १८ लाख, ६८ हजार ०५५ उद्योग सुरू झाले. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अवघे १४ लाख, १६ हजार २२४ उद्योग सुरू झाले होते.
‘मविआ’ सरकारच्या काळात ८८ लाख ४७ हजार ९०५ नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. शिंदे सरकारच्या काळात नवीन उद्योगांची संख्या ८ लाख ९४ हजार ६७४ वरून ७ लाख, ३४ हजार ९५६ वर घसरली. नवीन रोजगाराच्या संधी ४२ लाख ३६ हजार ४३६ वरून २४ लाख,९४ हजार, ६९१ इतकी कमी झाली, असा दावा पटोले यांनी केला.
पटोलेंची टीका
शिंदे- फडणवीस यांनी ‘मविआ’ सरकारवर कितीही टीका केली तरी आघाडी सरकारची असंविधानिक महायुती सरकारपेक्षा नक्कीच उत्तम कामगिरी होती, हे आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचे पटोले म्हणाले.