मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने सलग दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी आंदोलन करून राज्यपालांचा निषेध केला. औरंगाबादमधील समारंभात कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटविण्याची मागणी लावून धरली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लक्ष्य केले. राज्यातील जनताच फडणवीस यांना धडा शिकवेल, असे पटोले म्हणाले.
शिवसेनेनेही ठिकठिकाणी आंदोलन करून राज्यपालांचा निषेध केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सोमवारी दुपारी गिरगाव चौपाटी येथे जोरदार आंदोलन केले. पोलिसांनी दानवे यांच्यासह विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आणि अन्य शिवसेना नेत्यांना ताब्यात घेतले. दादर येथील शिवसेना भवनाजवळ शिवसेना कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. ‘‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघपुरस्कृत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाची त्यांनी सुपारीच घेतली आहे. त्यात सुधांशू त्रिवेदी यांचीही भर पडली असून, राज्यातील जनता हे खपवून घेणार नाही. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल’’, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांच्या वक्तव्याची पंतप्रधानांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करणारे पत्रही राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात आले आहे.
राज्यपालांची बुद्धी भ्रष्ट : उदयनराजे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्याऐवजी महाराजांचा इतिहास वाचला तर बरे होईल. त्यांचे विधान हे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे निदर्शक असल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार उदयनराजे यांनी दिली. कोश्यारी यांची उचलबांगडी करण्याची मागणीही त्यांनी केली.
राज्यपालांना हटवा : संभाजीराजे
महाराष्ट्र वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका संकुचित विचार राज्यपाल का करतात, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला. अशा व्यक्तीला मोदी यांनी राज्यपालपदावरून हटवावे अशी मागणीही त्यांनी केली.
भान ठेवून बोला- शिवेंद्रसिंहराजे :
समाजामधील जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्यपालांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी वक्तव्य कोणीच करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.