‘जहांगीर’, ‘आर्टिस्ट्स सेंटर’, ‘बजाज’ अशा संस्थात्मक कलादालनांतली आठवडय़ा-आठवडय़ानं बदलणारी प्रदर्शनं मुंबईच्या तप्त-दमट हवेतही कलेचा थंडावा या आठवडय़ात देत असताना, काही मोठी आणि वेळ देऊनच पाहावीत अशी प्रदर्शनंही सध्या भरली आहेत. यांपैकी एक आहे फोटोग्राफीचं- तेही नेपाळमधल्या फोटोग्राफीचं. ते प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीलगतच असलेल्या ‘मॅक्समुल्लर भवन’च्या प्रशस्त गॅलरीत भरलं आहे आणि सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक सद्य:स्थिती यांचं दर्शन घडवण्यासाठी नेपाळी छायाचित्रकार आपल्या कलेचा कसकसा उपयोग करीत आहेत, नेपाळमध्ये ४० किंवा ५० वर्षांपूर्वी फोटोग्राफीची स्थिती काय होती, या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज देणारं हे प्रदर्शन आहे. नेपाळबद्दल आस्था असलेल्या सर्वानी ते पाहायला हवंच, आणि फोटोग्राफीबद्दल विचार करू इच्छिणाऱ्यांनी तर या प्रदर्शनाच्या जागीच अवघ्या १०० रुपयांत मिळणारं १२६ पानी जाड कापडी बांधणीचं प्रत्येक पान सचित्रच असलेलं ‘पिक्स : द नेपाल इश्यू’ हे रंगीत पुस्तकवजा नियतकालिकही विकत घ्यायला हवं! या प्रदर्शनाच्या वैशिष्टय़ांकडे आपण पुढल्या आठवडय़ात सविस्तर पाहू. या आठवडय़ात, कुणालाही आवडीचाच वाटेल अशा दुसऱ्या विषयावर प्रचंड माहिती देणाऱ्या प्रदर्शनाची विस्तारानं ओळख करून घेऊ. सर्वानाच आवडू शकणारा हा विषय कोणता असेल?

बागा आणि बगीचे!

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Rose Winter Care: 7 Tips To Take Care of Your Rose Plants In Cold Weather
हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; रिझल्ट बघून आनंदून जाल, बहरून जाईल घर, जाणून घ्या टीप्स
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड

‘उद्यानशास्त्र’ किंवा ‘निसर्गरचनाशास्त्र (लँडस्केप आर्किटेक्चर)’ म्हटलं की दचकायला होईल.. पण बागबगीचे कुणाला आवडत नाहीत? डोंगरउतारावर किंवा धरणाच्या पाण्यावर साकारलेली उपवनं कुणाला आनंद देत नाहीत? त्या सुंदर बागांमागे ‘उद्यानशास्त्र’ असतं किंवा उपवनांमागे ‘निसर्गरचनाशास्त्र’ असतं, त्याची सहज तासाभरात ओळख करून घेण्याची छान संधी या प्रदर्शनानं दिली आहे. प्रदर्शन भरलंय खादी भांडारामागल्या ‘क्वीन्स मॅन्शन’ या इमारतीत (लिफ्टनं) तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ या प्रतिष्ठित गॅलरीत. आत शिरल्यावर डाव्या हाताला एका खोलीवजा भागात टीव्हीच्या पडद्यावर, हिंदी सिनेमांतली बागेतली गाणी लावलेली दिसतील.. फक्त गाणीच नव्हे, तर निसर्गाचा ‘लोकेशन’ म्हणून कसकसा वापर बॉलीवूडनं केला, हे थोडक्यात प्रेक्षकावर बिंबवण्याचा हा प्रयत्न आहे. प्रदर्शनाची प्रेरणा प्रभाकर बी. भागवत (जन्म १९३०) आणि मोहम्मद शकीर (जन्म १९४८) या, २०१५ साली दिवंगत झालेल्या दोघा उद्यानशास्त्रज्ञांकडून मिळाली, हेही नमूद आहे. त्या दोघांची थोडक्यात ओळख झाल्यानंतर, पुढली सात पॅनेल आपली वाटच पाहत असतात. या प्रत्येक पॅनेलमध्ये अनेक फलक आहेत. एकेक मोठमोठी भिंत एकेका पॅनेलनं भरली आहे.

पहिलं पॅनेल आहे ‘रीडिंग’ : उद्यानांबद्दल  कायकाय ‘वाचता’ येईल आणि कुठेकुठे, याचा चौफेर शोध प्रदर्शनाच्या नियोजकांनी घेतला. त्यामुळे इथं, उद्यानांविषयीचे अगदी मोजकी संस्कृत अवतरणं आणि आधुनिक साहित्यातले (गेल्या ५० वर्षांतल्या भारतीय इंग्रजी कादंबऱ्यांतले) संदर्भ पुस्तकाच्या अख्ख्या पानासह फलकावर आहेत. १७९२ सालापासून (वसाहतकार पाश्चात्त्यांनी, त्यांच्या यथातथ्यवादी शैलीत) केलेली चित्रं किंवा कोरीव ठशाची चित्रं (एन्ग्रेव्हिंग) आहेत. बगीचाला प्राधान्य देणारी सन १५९० पाासूनची भारतीय लघुचित्रं आहेत. पुढे गुलाममोहम्मद शेख, के. जी. सुब्रमणियन्, ए. रामचंद्रन यांची (आधुनिक) चित्रंही छापील छोटय़ा आकारांत आहेत. िहदी सिनेमांची पोस्टरं (शो कार्ड) आहेत आणि ‘डिजिटल’ क्रांतीनंतर निसर्गरूपं कसकशी दिसली, याचीही झलक आहे. ‘भंवरा बडा नादान..’ सारखी बागेला महत्त्व देणारी गाणी कुठकुठली, हे सांगणाराही एक फलक आहे. पण हे सारं अवांतर. ‘शास्त्रा’ची माहिती देणारं प्रदर्शन दुसऱ्या पॅनेलपासून सुरू होतं. प्रदर्शनातली माहिती फक्त इंग्रजीतच असल्यानं सर्व पॅनेलची नावंही  इंग्रजी आणि ‘इंग- इंग’ असं यमक साधणारी आहेत. त्यापैकी हे दुसरं पॅनेल ‘नर्चरिंग’, तिसरं ‘पर्सीव्हिंग’, चौथं ‘रायटिंग’.. वगैरे. पण आपण या नावांची चिंता न करताही माहिती वाचू शकतो.

दुसऱ्या पॅनेलमध्ये गवतांचे प्रकार, शोभिवंत दिसणाऱ्या वनस्पतींचे फर्न (नेचावर्गीय), फिकस हे उपप्रकार, बोगनवेली आदींची माहिती आणि ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतात ‘बंगल्याभोवतीच्या बागे’ची आवड रुजल्यानंतरच्या काळातले नर्सरीचे कॅटलॉग दाखवणारे फलक आहेत. आग्रा येथील आझाद व रिझवी नर्सरी; वृंदावनचा ‘बांकेबिहारीजी का बगीचा’ यांची रचना इथं समजावून दिली आहे. तिसऱ्या विभागात उद्यानरचनांचे प्रकार, प्रासादाभोवतीची उद्याने, यांविषयीची माहिती आहेच पण एक फलक बाग, अंगण, उपवन, वाडी, गोळी/गौली या भारतीय शब्दांच्या व्युत्पत्तीसह त्यांचे इंग्रजी अर्थ देणारा आहे. यापैकी ‘बाग’ हा अतिपरिचित शब्द मुळात ‘भाग’पासूनच तयार झाला, अशी मनोरंजक माहिती मिळते. मोठय़ा उपवनांसाठी नैसर्गिक परिस्थिती महत्त्वाची असतेच. त्यादृष्टीनं भारतातील शेतीचे प्रकार, महामार्ग (रचना) यांचीही माहिती आहे. आक्रमक वनस्पती, घातक वनस्पती कुठल्या, याचीही माहिती याच पॅनेलवर आहे.

‘मॅन्युअल ऑफ गार्डनिंग फॉर बेंगाल अ‍ॅण्ड अप्पर इंडिया’ हे ऑगस्टस चार्ल्स फर्मिजर यांचं १८६३ साली प्रकाशित झालेलं पुस्तक हे ‘भारतीय उद्यानशास्त्रा’त पाश्चात्त्यांनी आणलेल्या आधुनिकतेची पहिली खूण (त्याहीआधी भारतीय वनस्पतींबद्दल पाश्चात्त्यांनी पुस्तकं लिहिली होती, पण ती उद्यानशास्त्राबद्दल नव्हती)! या पुस्तकासह पुढे १९२८, १९५२, १९६० सालांत निघालेल्या पुस्तकांची झलक दोन फलकांवर आहे. उद्यानशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांचा संबंध दूरचा नाही. उलट, अनेक वनस्पती-अभ्यासक आणि बरेच वनस्पतिशास्त्रज्ञ उद्यानशास्त्रालाही पुढे नेणारे होते, हे दाखवून देणारं पुढलं पॅनेल, एकेका शास्त्रज्ञाची थोडक्यात माहिती देणारं आहे.

सहावं पॅनेल हे अधिक आकर्षक, अधिक चित्रमय आणि अधिक रंगीत आहे. वनस्पतींचं प्राचीन भारतीय वर्गीकरण, मुगलकाळातच ज्यांना प्रसार वाढला अशी शोभेची तसंच सुवासिक फुलांची झाडं, वसाहतकाळात भारतात रुजलेल्या आणखी काही वनस्पती, आजच्या भारतीय उद्यानांत सर्वाधिक दिसणारी झाडं, भारतीय वनस्पतींच्या शास्त्रीय अभ्यासात जगदीशचंद्र बोस यांचं योगदान, त्याला संस्थात्मक रूप देणारी कोलकात्याची ‘अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया’ यांची माहिती इथं आहे.

त्यापुढलं पॅनेल म्हणजे या मोठय़ा गॅलरीच्या दोन खोल्या! देशभरातल्या, सर्व काळांतल्या २७ बागांची सचित्र माहिती इथं आहे, त्यातून निसर्गरचनाशास्त्राबद्दल भरपूर काही जाणून घेता येतं. डोंगरउतारावरची निशात बाग, मुगलकाळात यमुनातटी रांगेनं फुलवलेल्या ४२ बागा, ताजमहालची मेहताब बाग इथपासून ते पुण्या-नाशिकला आजही पाहता येणाऱ्या बागांपर्यंत (अर्थातच, व्हाया वृंदावन गार्डन वगैरे) माहिती इथं पाहता-वाचता येईल.

शैक्षणिक अनुभव देणारं हे प्रदर्शन आहे. दिवसभराच्या एखाद्या शिबिरात जेवढी माहिती मिळेल, तेवढी इथं नक्की आहे. त्यामुळे प्रदर्शन पाहायला जरा वेळ काढून जा. प्रदर्शन २७ मे पर्यंतच आहे आणि ते रविवारी बंद असतं.

आज संग्रहालय दिन!

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन १८ मे रोजी साजरा होतो. यंदा मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयानं  (एनजीएमए) या दिवसानिमित्त दिलीप रानडे आणि बिल्वा कुलकर्णी यांच्याशी कलाप्रेमींच्या संवादाचा कार्यक्रम दुपारी चार वाजता ठेवला आहे. चित्रकार म्हणून अधिक प्रसिद्ध असलेले रानडे हे ‘एनजीएमए’च्या समोरच्याच ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त (पूर्वीचं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) कलातज्ज्ञ या नात्यानं जबाबदारीच्या उच्चपदी होते, तर बिल्वा कुलकर्णी सध्या तिथे कार्यरत आहेत.

Story img Loader