मुंबई : फटाक्यांवरील निर्बंध, वायुप्रदूषण आणि न्यायालयीन बंधने यामुळे यंदा दिवाळीत ध्वनिप्रदूषण कमी होईल, असा अंदाज मुंबईकरांनी खोटा ठरवला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या कडकडाटाने ध्वनिप्रदूषणाची पातळी गेल्या वर्षीपेक्षा वाढली. शहरातील सर्वाधिक आवाजाची नोंद मरिन ड्राइव्ह आणि शिवाजी पार्क परिसरात झाली आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळीही फटाक्यांमुळे वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आवाज फाऊंडेशन’तर्फे दिवाळीच्या चारही दिवसांत शहराच्या विविध भागांत आवाजाची पातळी नोंदवली जाते. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने फटाके वाजविण्याच्या वेळेवर निर्बंध घातल्यामुळे फटाके उडविण्याबद्दल संभ्रम पसरला होता. मात्र यंदा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी मुंबईकरांनी न्यायालयीन बंधने झुगारून फटाके उडविले. दरम्यान, यंदा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने सकाळीही फटाके उडविण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. यंदा मरिन ड्राइव्ह परिसरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ९ ते ११.२५ या वेळेत ८२ ते ११७ डेसिबल आवाजाची नोंद झाली. शिवाजी पार्क परिसरात ११.४५ वाजेपर्यंत ९५ डेसिबल तर, कार्टर रोड येथे ७२-८५ डेसिबल आवाज नोंदवला गेला. दरम्यान, वायुप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी आहे. मात्र मरिन ड्राइव्ह येथे रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी सीरियल बॉम्ब आणि मोठय़ा आवाजात हवाई बॉम्ब फोडले तेव्हा तेथे सर्वाधिक आवाजाची पातळी नोंदवली गेल्याचे आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलली यांनी सांगितले. मरिन ड्राइव्ह येथे रात्री १० वाजल्यानंतर पोलिसांनी फटाके बंद करण्यास सुरुवात केली व नियम न पाळणाऱ्या नागरिकांना ताब्यातही घेतले.

हेही वाचा >>>शिंदे गटातील दोन बड्या नेत्यांचे एकमेकांवर गंभीर आरोप, ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “गद्दारीचे वाभाडे…”

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढले. यापूर्वी २०२२च्या दिवाळीत मरिन ड्राइव्ह येथे आवाजाची सर्वाधिक आवाजाची पातळी म्हणजेच १०९.१ डेसिबल नोंदली गेली होती, तर २०२१ मधील दिवाळीत शिवाजी पार्कमध्ये सर्वात जास्त १००.४ डेसिबल आवाज नोंदवला गेला होता.

आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांच्या प्रमाणात वाढ

मागील काही वर्षे दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाची पातळी कमी असली तरी, आकाशात फुटणारे फटाके वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. हे फटाकेही मोठय़ा आवाजाचे असतात. जमिनीवरून त्यांच्या आवाजाचा अंदाज येत नसला तरी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. या आतषबाजीमुळे हवेतील प्रदूषणात मोठी वाढ होते. दरम्यान, फटाक्यांच्या बॉक्सवर आवाजाच्या पातळीची मर्यादा छापणे बंधनकारक असले, तरी उत्पादक कंपन्या ते टाळत आहेत.मरिन ड्राइव्ह येथे रात्री १० वाजल्यानंतर पोलिसांनी फटाके बंद करण्यास सुरुवात केली व नियम न पाळणाऱ्या नागरिकांना ताब्यातही घेतले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maximum noise pollution due to firecrackers in marine drive shivaji park area in diwali 2023 amy