मुंबई : गेल्या आठवडय़ापासून मुंबईला हुडहुडी भरवणारी थंडी ओसरली आहे. मुंबईत सोमवारी कमाल तापमान ३५ अंश. सें.पर्यंत नोंदवण्यात आल्याचे हवामान खात्याने सांगितले.
गेल्या आठवडय़ात उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमाल तापमानात घसरण झाली होती. गेल्या शुक्रवारी तर कमाल तापमान २४ अंश सें.पर्यंत खाली आले आणि फेब्रुवारी महिन्यातील गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी किमान तापमानही ११ अंश सें.वर आले. रविवारपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी सांताक्रूझ येथे ३५.१ अंश सें. आणि कुलाबा येथे ३३.० अंश. सें. कमाल तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ येथे किमान तापमान १५.४ अंश सें. इतके तर कुलाबा येथे १८.८ अंश सें.पर्यंत नोंदले गेले.
हवेची गुणवत्ता ढासळली
मुंबईची सर्वसाधारण हवेची गुणवत्ता सोमवारी ‘सफर’ने ‘वाईट’ या स्तरावर नोंदवली. हवेचा निर्देशांक (एक्यूआय) २६९ नोंदविण्यात आला, अनेक विभागांत अत्यंत वाईट स्तरापर्यंत ढासळल्याचे दिसले. मालाड (३२३), माझगाव (३०१), बोरिवली (३०५), बीकेसी (३५१) आणि अंधेरी (३६१) येथील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट या स्तरापर्यंत घसरल्याचे निदर्शनास आले. सर्वात खालावलेला हवेचा निर्देशांक अंधेरी विभागात नोंदविण्यात आला.