मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्यात कमाल तापमान चढे होते. मागील दोन दिवसांपसाून राज्यातील थंडीतही चढ – उतार होत आहे. काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी कमाल तापमानात घट झाली असून संपूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील २० दिवस कमाल तापमान चढे असताना सोमवारी मात्र कमाल तापमान ३० अंशाच्या आत नोंदले गेले.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवरील तापामान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले. मागील अनेक दिवस मुंबईतील कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले जात होते. त्यानंतर सोमवारी पहिल्यांदा हंगामातील कमी कमाल तापमान नोंदले गेले. याआधी ४ डिसेंबर रोजी कुलाबा केंद्रात ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. या दिवसाची १६ वर्षांनी डिसेंबरमधील सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंद झाली. किमान तापमानात मात्र सोमवारी किंचत वाढ झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही भागात पावसाला देखील पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ – उतार होण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

हेही वाचा – तळोजा येथील गृहप्रकल्पातील १७०० सदनिका खरेदीदारांच्या फसवणुकीचा आरोप, विकासक ललित टेकचंदानी यांची अटक बेकायदा

हेही वाचा – मुंबई : दहा वर्षांच्या इराकी मुलीवर तोंडाच्या ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया!

हवामान विभगाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, बुधावरी ढगाळ वातावरणचा अंदाज आहे. तर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमधील काही भागात गुरुवारी ढगाळ हवामानाबरोबरच हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

Story img Loader