लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : केईएम ही मुंबईसह देशातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे, ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे. केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षामध्ये पदार्पण केले असून, या वर्षात पुढील १०० वर्षांचे नियोजन करण्याबरोबरच मागील १०० वर्षांचे सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे शताब्दी वर्ष समाजाला काही तरी देणारे ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिका संचालित सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाचा (केईएम) शताब्दी वर्ष शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक शनिवारी सकाळी ११ वाजता पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, स्थानिक आमदार अजय चौधरी, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, सार्वजनिक आरोग्य उपायुक्त संजय कुऱ्हाडे, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते.
आणखी वाचा-आता दूषित रक्तासाठीही पैसे, रक्तपेढ्यांसाठी सुधारित नियम
केईएम रुग्णालयाच्या १०० वर्षांच्या काळात संस्थेसाठी समर्पणवृत्तीने काम करणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे, हे धोरण राज्याने स्वीकारले आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. करोनाच्या काळात शासकीय रुग्णालयांचे कामकाज निश्चितच कौतुकास्पद होते. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. केईएममध्ये प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली जाते, हे अरुणा शानभाग प्रकरणातून समोर आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आणखी वाचा-आयर्लंडच्या एअर कंपनीला अनावश्यकपणे न्यायालयीन लढाईत सहभागी करणे भोवले
केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे, रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठी नियोजित एकवीस मजली इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. केईएम रुग्णालयाच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत यावेळी प्रदर्शित करण्यात आली. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला डॉक्टर, प्राध्यापक, तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.