उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांच्या साक्षीने त्यांनी मायावतींवर असा धार्मिक तीर मारला आहे.
रिपब्लिकन पक्षातर्फे नागपूरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत आठवले यांनी मायावतींवरच हल्ला चढवला. हिंदुत्वादी भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या भाजप-सेनेशी आठवले यांनी युती केली आहे. त्याच भाजप नेत्यांच्या साक्षीने आठवले यांनी मायावती यांनी अजून बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असा सवाल केला आहे. त्याच्या प्रतिक्रिया बसप व इतर आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये उमटल्या आहेत. हिंदुत्ववादी पक्षांशी युती करणाऱ्या आठवलेंना मायावतींनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असा प्रश्न विचारण्याचा काय अधिकार, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला आहे.
शिवसेनेने पाठ  फिरवली
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला आवर्जून हजेरी लावली तर सेना नेत्यांनी त्याकडे पाठ फिरविली. वास्तविक उद्धव ठाकरे त्या दिवशी नागपुरात होते. सेनेचे सारे आमदारही नागपुरात आहेत. तरीही आठवले यांच्या सभेकडे कुणी फिरकले नाही. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आठवले यांच्या राज्यसभेच्या खासदारकीबद्दल आवाक्षर काढले नाही.

Story img Loader