* विरोधकांचे अर्जही ठरले बाद
नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान महापौर सागर नाईक यांचा ऊमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला. त्यामुळे विजयी थाटात महापालिकेत आलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सदस्यांची विरोधकांकडून जोरदार रेवडी ऊडवली. सागर नाईक यांच्या सुदैवाने शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज हळदणकर, सुतीश रामाणे तसेच कॉग्रेसचे अमित पाटील यांचे अर्जही पुरेशी कागदपत्र नसल्याने बाद ठरले. अन्यथा एकहाती बहुमत असून विरोधकांचा महापौर खुर्चीवर बसलेला पहाण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली असती.
सर्व ऊमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने महापौरपदाची निवडणुक पुढे ढकलण्यात आली असून पालकमंत्री गणेश नाईक यांचा पुतण्या असूनही सागर नाईक यांना साधे जात वैधता प्रमाणपत्र सादर करता आले नसल्याने नाईक पालकमंत्र्यानाही ही एकप्रकारे चपराक मानली जात आहे. विशेष म्हणजे, नगरसचिव विभागातून आपले जात वैधता प्रमाणपत्र जाणीवपुर्वक गहाळ करण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे ऊमेदवार मनोज हळदणकर यांनी निवडणुक आयोगाकडे केली असून याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नवी मुंबईचे पुढील अडीच वर्षांचे महापौरपद इतर मागासवर्गीय जातीसाठी (ओबीसी) आरक्षीत आहे. शुक्रवारी महापालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयात महापौरपदाची निवडणुक सुरु होताच शिवसेनेच्या सदस्यांनी सागर नाईक यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. सागर नाईक हे खुल्या प्रवर्गातील प्रभागातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करावे, अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार हळदणकर यांनी केली. यावर निवडणुक निर्णय अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांनी नाईक यांना अर्ज तपासला असता जातीचे वैधता प्रमाणपत्र त्यांना आढळून आले नाही. त्यामुळे अर्ज बाद करत असल्याचे जावळे यांनी जाहीर करताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या तोंडचे पाणीच पळाले. यानंतर शिवसेनेचे मनोज हळदणकर, सतीश रामाणे तसेच कॉग्रेसचे ऊमेदवार अमित पाटील यांचे अर्जही जातीचे प्रमाणपत्र नसल्याने बाद ठरविण्यात आले. मात्र, आपण ओबीसी राखीव मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आलो असल्याने आम्हाला महापौर निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची आवश्यकता काय, असा सवाल शिवसेना, कॉग्रेसच्या उमेदवारांनी केला आहे. निवडणुक अधिकाऱ्यांनी त्यांचा युक्तीवाद अमान्य करत अर्ज बाद केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असतानाही केवळ सत्तेची धुंदी चढल्याने नाईक यांनी ते सादर केले नाही, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. निवडणुक प्रक्रिया पार पडताच बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाबाहेर शिवसेना तसेच कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा करत सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले.
जातीमुळे नवी मुंबईच्या महापौरांना धक्का
नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान महापौर सागर नाईक यांचा ऊमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2012 at 06:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayer trouble in presenting fake cast certificate