मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून फेरीवाल्यांच्या या फैलावाला महापालिका आयुक्त हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा ‘घरचा अहेर’ महापौर सुनील प्रभू यांनी आज दिल्याने पालिकेतील सत्ताधारी व प्रशासन यांच्यातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावरील शीतयुद्ध उघड झाले आहे. जे काम महापालिकेच्या उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांनी करणे अपेक्षित आहे ते काम वसंत ढोबळे यांना करण्याची वेळ का येते याचा विचार आयुक्तांनी करावा, असा टोलाही महापौरांनी हाणला.
सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. उच्च न्यायालयाचे आदेश असताना अनधिकृत फेरावाले मुंबईतील सर्व पदपथांवर ठाण देऊन बसतातच कसे असा सवाल करून पालिका अधिकाऱ्यांकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. अन्यथा प्रत्येक विभागात पालिकेचे अधिकारीही ढोबळे बनून काम करू शकतात. काही वर्षांपूर्वी पालिका उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात हातोडा यशस्वीपणे चालवून दाखवला होता. आज जागोजागी अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहात आहेत. पालिकेच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या व म्हाडाच्या अखत्यारीतील मोकळ्या जागांचा कब्जा झोपडीदादा घेत आहेत हे सारे सत्ताधारी म्हणून शिवसेना यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही महापौर प्रभू यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिला. खारफुटीची कत्तल करून झोपडय़ा उभ्या राहतात तेव्हा पालिकेचे अधिकारी झोपा काढत असतात का असा सवाल करून, आयुक्तांनी प्रत्येक सहाय्यक पालिका आयुक्ताला एक तरी रस्ता द्यावा ज्यावरील फेरीवाले हटविण्याची शंभर टक्के जबाबदारी त्यांची राहील, अशी सूचना महापौरांनी केली. एखाद्या भागात पोलीस संरक्षणाची गरज लागू शकते अशा ठिकाणी पोलीस मिळत नसतील तर पालिका आयुक्तांनी तसे जाहीर करावे म्हणजे आम्ही ‘योग्य ती काळजी’ घेऊ असेही महापौर म्हणाले. महापालिकेचे सुरक्षा रक्षक व कमांडो नेमके काय काम करतात, त्यांचा वापर अनधिकृत फेरीवावाल्यांवरील कारवाईसाठी का केला जात नाही, याचेही उत्तर आयुक्तांनी दिले पाहिजे. अनधिकृत फे रीवाल्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर आयुक्तांना त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

Story img Loader